Anant Ambani-Radhika Merchant Sangeet: सध्या मुकेश व नीता अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. १२ जुलैला अनंत अंबानी राधिका मर्चंट हिच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळे लग्नाआधीचे कार्यक्रम सध्या सुरू आहेत. काल, ५ जुलैला अनंत-राधिकाचा मोठ्या थाटामाटात संगीत सोहळा पार पडला. मुंबईतील नीता मुकेश अंबानी कन्व्हेन्शनल सेंटरमध्ये झालेल्या या संगीत सोहळ्याला जस्टिन बीबरसह बॉलीवूडच्या कलाकारांनी परफॉर्मन्स केला. यावेळी सलमान खानच्या लोकप्रिय गाण्यांवर बॉलीवूडचे कलाकार थिरकताना पाहायला मिळाले.
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्याला अभिनेता सलमान खान, माधुरी दीक्षित, रणबीर कपूर, आलिया भट्ट, शाहिद कपूर, कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन, दिशा पटानी, पूजा हेडगे, रितेश देशमुख, जिनिलीया देशमुख असे अनेक बॉलीवूडचे कलाकार उपस्थित राहिले होते. तसंच इतर क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी देखील अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्याला खास हजेरी लावली होती. या संगीत सोहळ्यात अभिनेता रणवीर सिंहने एनर्जेटिक असा डान्स परफॉर्म केला. तसंच अर्जुन कपूर, जान्हवी कपूरचाही जबरदस्त डान्स पाहायला मिळाला.
अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात रणवीर सिंहने सलमान खानच्या ‘इश्क दी गली विच नो एन्ट्री’ गाण्यावर डान्स केला. तर अर्जुन कपूर आणि जान्हवी कपूर देखील सलमानच्याच ‘मारिया मारिया’ गाण्यावर ग्रुप डान्स करताना पाहायला मिळाले. रणवीर, अर्जुन आणि जान्हवी कपूरचा हा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
दरम्यान, १२ जुलैला अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचं हिंदू पद्धतीनं लग्न होणार आहे. त्यानंतर १३ जुलैला शुभ आशीर्वादाचा कार्यक्रम होणार असून १४ जुलैला मोठा रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या लग्नसोहळ्यात बॉलीवूड सेलिब्रिटींसह दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत