बॉलीवूडचा एनर्जेटिक अभिनेता रणवीर सिंह सध्या आयुष्याच्या नव्या टप्प्यावर आहे. नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात रणवीरने वडील होण्याच्या आनंदावर व्यक्त होताना सांगितलं की, त्याच्या जीवनातील हा क्षण एखाद्या जादुई क्षणासारखा आहे. नुकतंच रोहित शेट्टीच्या बिग-बजेट चित्रपट ‘सिंघम अगेन’मध्ये झळकलेल्या रणवीरने एका कार्यक्रमात तो बाबा झाल्याने त्याच्या आयुष्यात काय बदल झाला यावर भाष्य केलं आहे.
वडील होण्याचा अनुभव जादूई
वडील झाल्याच्या अनुभवाचे वर्णन करताना रणवीरने सांगितलं, “माझा आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत. ही अनुभूती जादूसारखी आहे. मी खूप आनंदी आहे. माझा आनंद व्यक्त करण्यासाठी कुठल्याच भाषेत शब्द नाहीयेत. जेव्हा तुम्हाला दुःख होत तेव्हा तुम्ही ते शेअर केल्यास ते कमी होत आणि जेव्हा तुम्हाला आनंद होतो तेव्हा तो शेअर केल्यास तो दुपटीने वाढतो. त्यामुळे मी हा आनंद शेअर करत आहे. हे एखाद्या जादूसारखं आहे.”
कार्यक्रमात रणवीरने असंही नमूद केलं की, “मी खूप दिवसांपासून आता वडिलांच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे.” या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे आणि चाहत्यांकडून रणवीरच्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पाहा व्हिडीओ –
दीपिका-रणवीरचे घर उजळले
रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांनी सप्टेंबर महिन्यात त्यांच्या मुलीचं स्वागत केलं. त्यांच्या लग्नाच्या जवळपास सहा वर्षांनंतर आलेल्या या गोड बातमीने चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरलं . दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक मेसेज शेअर करत त्यांच्या कन्येच्या आगमनाची बातमी दिली होती.
दिवाळीच्या निमित्ताने कन्येचं नाव जाहीर
दिवाळीच्या खास दिवशी दीपिका आणि रणवीर यांनी पोस्ट शेअर करून आपल्या मुलीच्या नावाची घोषणा केली. ‘दुआ पादुकोण सिंग’ असं त्यांच्या लाडक्या लेकीचं नाव आहे.
फेब्रुवारी महिन्यात दिली होती गुड न्यूज
दीपिका आणि रणवीर यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये ते आईबाबा होणार आहेत अशी बातमी दिली होती. रणवीर आणि दीपिका नुकतेच ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात झळकले, ज्यामध्ये दीपिकाने रोहित शेट्टीच्या ‘कॉप युनिव्हर्स’मध्ये ‘लेडी सिंघम’ म्हणून पदार्पण केलं. मात्र, या चित्रपटात रणवीर आणि दीपिकाचे कोणतेही सीन्स एकत्र नव्हते.
© IE Online Media Services (P) Ltd