रणवीर सिंह हा बॉलीवूड अभिनेता काही दिवसांपासून आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांना ८ सप्टेंबर २०२४ ला मुलगी झाली आहे. ही माहिती समजताच सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाल्याचे पाहायला मिळाले. आता मुलीच्या जन्मानंतर रणवीर सिंहने पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी पापाराझींना पोज दिल्यानंतर वडील झाल्याबद्दल तो आनंद व्यक्त करताना दिसला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिलायन्स फाऊंडेशन आणि नीता अंबानी यांनी आयोजित केलेल्या ‘युनायटेड इन ट्रायम्फ’ (United in Triumph) या कार्यक्रमात रणवीर सिंहने हजेरी लावली. भारताच्या ऑलिम्पियन्स आणि पॅरालिम्पियन्सच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मुलीच्या जन्मानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पापाराझी रणवीर सिंहला तो वडील झाल्याबद्दल शुभेच्छा देत आहेत. अभिनेता हात जोडून या शुभेच्छांचा स्वीकार करताना दिसत आहेत. पापाराझींना फोटोसाठी पोज देऊन झाल्यानंतर तो त्यांच्याकडे जातो आणि हस्तांदोलन करीत आनंदाने मी वडील झालो (बाप बन गया रे), असे ओरडताना दिसत आहे. त्याच्या या वागण्याचे नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर कौतुक केल्याचे पाहायला मिळत आहे.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहने २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या सहा वर्षांनंतर २०२४ ला त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. याबाबतची माहिती त्यांनी इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवरून शेअर केली होती. त्यामध्ये “वेलकम बेबी गर्ल. ८-९-२०२४”, असे लिहिल्याचे पाहायला मिळाले होते.

हेही वाचा: “जर तिला हे नाते…”, अरबाज पटेलचे निक्की तांबोळीबाबत मोठे वक्तव्य; म्हणाला, “आता करिअर…”

दरम्यान, रणवीर सिंहच्या कामाबद्दल बोलायचे, तर तो रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात सिम्बाच्या भूमिकेत दिसणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या चित्रपटात त्याची पत्नी अभिनेत्री दीपिका पदुकोणदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या दोघांबरोबरच अजय देवगण, अर्जुन कपूर, करीना कपूर हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. त्याबरोबरच तो आदित्य धरच्या अॅक्शन थ्रिलर चित्रपटातदेखील दिसणार आहे. त्यामध्ये आर. माधवन, अक्षय खन्ना व अर्जुन रामपाल हे अभिनेतेदेखील असणार आहेत. या चित्रपटाचे नाव अद्याप उघड केलेले नाही. या चित्रपटातील भूमिकेसाठी रणवीर सिंहने १५ किलो वजन वाढवल्याची माहिती समोर आली आहे. याआधी तो ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranveer singh happiness after welcoming daughter baap ban gaya re tells paparazzi video viral nsp