बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. एकीकडे मुकेश खन्ना हे रणवीरवर चांगलेच वैतागले आहेत, तर दुसरीकडे रणवीर आणि दीपिका यांनी नुकत्याच दिलेल्या गोड बातमीमुळे दोघे चर्चेत आहेत. अशातच आता रणवीर सिंगच्या ‘डॉन ३’ चे चित्रीकरण लांबणीवर पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामागे कारणही रणवीर सिंगच आहे.
मध्यंतरी निर्माता व दिग्दर्शक फरहान अख्तरने रणवीर सिंगला घेऊन ‘डॉन ३’ची घोषणा केली. यामुळे त्याला प्रेक्षकांचा व शाहरुखच्या चाहत्यांचा रोष पत्करावा लागला. रणवीर या भूमिकेसाठी अजिबात योग्य नाही असं मत बऱ्याच लोकांनी मांडलं. आता या चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट समोर येत आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सुरू होणार होतं, पण आता काही कारणास्तव हे चित्रीकरण लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आणखी वाचा : नागराज मंजुळेंच्या आगामी ‘मटका किंग’ सीरिजची घोषणा; ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारणार रतन खत्रीची भूमिका
काही दिवसांपूर्वी रणवीर सिंग ब दीपिका पदूकोण यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून त्यांच्या घरी एक छोटा पाहुणा येणार असल्याची गोड बातमी दिली होती. ‘डॉन ३’च्या चित्रीकरणाचा महिना व दीपिकाला दिलेली ड्यु डेटसुद्धा त्याच महिन्यातली असल्याने रणवीरच्या ‘डॉन ३’चे चित्रीकरण लांबणीवर पडणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे. ‘ईटाइम्स’च्या रिपोर्टनुसार दीपिकाने तिची सगळी कामं पूर्ण केली आहेत तर रणवीर सिंग लवकरच एक मोठा ब्रेक घेण्याच्या तयारीत आहे.
दीपिकाबरोबर वेळ घालवण्यासाठी रणवीर ही सुट्टी घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. यामुळेच ‘डॉन ३’चं चित्रीकरण लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. रणवीरच्या या ‘डॉन ३’मध्ये कियारा अडवाणीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या रणवीर ‘डॉन ३’, ‘शक्तिमान’, ‘बैजू बावरा’ या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. रणवीरच्या ब्रेकचा या तीनही चित्रपटांच्या चित्रीकरणावर परिणाम होऊ शकतो असं यावरुन स्पष्ट होत आहे.