दमदार अभिनय आणि भन्नाट फॅशनसाठी ओळखला जाणारा अभिनेता रणवीर सिंग हा कायम चर्चेत असतो. चाहत्यांशी त्याचा असलेला थेट संपर्क, त्याचा बिनधास्त स्वभाव, त्याने केलेलं नग्न फोटोशूट यामुळे रणवीर कायम चर्चेत असतो. याबरोबरच वेगवेगळ्या जाहिरातीतसुद्धा रणवीरचा हा बोल्ड अंदाज आपण पाहिलेला आहे. अशाच एका जाहिरातीमुळे रणवीर पुन्हा चर्चेत आला आहे.
‘पेप्सी’ या सॉफ्ट ड्रिंक कंपनीची एक नवी जाहिरात सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या जाहिरातीत रणवीर सिंग आपल्याला दिसत आहे. नेहमीप्रमाणेच तो अत्यंत भन्नाट कपडे परिधान करून रस्त्यावरून वावरताना दिसत आहे, आणि याचदरम्यान काही लोक त्याच्यावर टीका करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या जाहिरातीच्या शेवटी रणवीरने त्याच्यावर टीका करणाऱ्या सगळ्यांनाच उत्तर दिलं आहे.
आणखी वाचा : सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ला कुटुंबाने दिला हिरवा कंदील; खास शो पाहून सगळे म्हणाले…
या जाहिरातीत रणवीर नेपोटीजममुळे पुढे आला आहे, तो एक जोकर आहे असे आरोप लोक त्याच्यावर करताना दिसत आहे. या जाहिरातीच्या शेवटी एक वडील आपल्या मुलाला रणवीर सारखं न बनण्याचा सल्ला देताना दिसतात. रणवीर या मुलाला वाटेत थांबवतो आणि त्याला सांगतो की, “ऐकायचं सगळ्यांचं पण करायचं आपल्या मनाचंच.”
ही जाहिरात रणवीरने सोशल मीडियावर शेअर करत लोकांना एक संदेश दिला आहे की काही लोक तुम्हाला खाली खेचणार पण तुम्ही कायम प्रगती करत राहिलं पाहिजे. रणवीरच्या या जाहिरातीचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे. ट्रोलर्स आणि टीकाकारांना रणवीरने अत्यंत सडेतोड उत्तर दिलं आहे असं त्याच्या चाहत्यांचं म्हणणं आहे. रणवीर सिंग नुकताच रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ या चित्रपटात झळकला होता. आता तो करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ या चित्रपटात आलिया भट्टबरोबर दिसणार आहे.