अभिनेता रणवीर सिंग सध्या दुबईमध्ये आहे. दुबईमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ‘फिल्मफेअर मिडल ईस्ट अवॉर्ड्स’ या कार्यक्रमाला रणवीरने हजेरी लावली होती. तेथे ‘सुपरस्टार ऑफ द डेकेड’ हा पुरस्कार देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे या पुरस्कार सोहळ्यासाठी त्याचे आईवडील दुबईला पोहोचले होते. पुरस्कार मिळाल्यानंतर रणवीरने त्यांना संबोधून छोटंसं भाषण केले. मान्यवरांसमोर बोलताना तो भावूक देखील झाला. या सोहळ्याला बॉलिवूडमधील अन्य सेलिब्रिटींनीही उपस्थिती लावली होती.
शनिवारी फिल्मफेअरच्या सोहळ्यानंतर रविवारी त्याने अबुधाबी शहरामध्ये आयोजित केलेल्या ‘२०२० अबुधाबी ग्रँड प्रिक्स’ या फॉर्मूला १ रेसिंग कारच्या स्पर्धेला भेट दिली. अतरंगी कपडे परिधान करत तो ही भव्यदिव्य स्पर्धा पाहायला गेला. स्पर्धेच्या ठिकाणी एफ १ रेसिंग क्षेत्रामधील अनेक मान्यवर उपस्थित होते. तेथे रणवीर मार्टिन ब्रंडल (Martin Brundle) या एफ १ रेसिंगमधील दिग्गज खेळाडूला भेटला. तेव्हा त्यांनी रणवीरला “तुला कसं वाटतं आहे?” असा प्रश्न केला. त्यावर त्याने “मी आता जगाच्या सर्वोच्च स्थानावर आहे असे वाटतंय. मी खूप आनंदी आणि उत्साही आहे”, असे उत्तर दिले.
पुढे मार्टिन त्याला म्हणाले, “मी क्षणभरासाठी ‘तू कोण आहेस’ हे विसरलोय.” त्यांचे बोलणं ऐकून रणवीर नम्रपणे म्हणाला, “सर मी बॉलिवूड सिनेसृष्टीमधील अभिनेता आहे. मी मूळचा मुंबईचा आहे, भारतीय आहे. मी एक एन्टटेनर आहे.” या भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. रणवीरच्या विनम्र उत्तराचे नेटकरी खूप कौतुक करत आहेत. या प्रकरणावरुन मार्टिन ब्रंडल सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत.
रणवीरच्या ‘८३’ आणि ‘जयेशभाई जोरदार’ या दोन चित्रपटांना प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. काही दिवसांपूर्वी त्याच्या ‘रॉकी और रिंकी की प्रेम कहानी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली. त्याआधी त्याचा ‘सर्कस’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.