बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगला अभिनयाव्यतिरिक्त खेळातही रुची आहे. क्रिकेटपासून ते फुटबॉल आणि बास्केटबॉलपर्यंत प्रत्येक खेळावर त्यानं आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. वर्षाच्या सुरुवातीला, तो एनबीए ऑल-स्टार गेममध्ये भाग घेण्यासाठी यूएसला गेला आणि नंतर इंग्लिश प्रीमियर लीग दरम्यान यूकेला गेला. खेळाचा रणवीर सिंगच्या वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम होतो. नुकताच त्यानं याचा खुलासा केला आहे. रणवीरनं सांगितलं की, त्याचं त्याच्या मेहुणीशी म्हणजेच दीपिकाच्या बहिणीशी यावरून भांडण झालं होतं.
दीपिका पदुकोणची बहीण अनिषा एका व्यावसायिक गोल्फ खेळाडू आहे. अनीशाबद्दल बोलताना रणवीर म्हणाला, “जेव्हा मी आणि अनिषा एकमेकांना भेटतो तेव्हा आमच्यात नेहमीच भांडणं होतात. खासकरून फुटबॉलवरून आमची भांडणं सगळ्यात जास्त होतात. मी आर्सेनलचा खूप मोठा चाहता आहे आणि अनिषा मॅनचेस्टर युनायटेडला नेहमीच पाठिंबा देते. त्यामुळे जेव्हा या दोन टीममध्ये सामना असतो त्यावेळी घरातील वातावरण नेहमीच गरम असतं.”
आणखी वाचा- …अन् रणवीर दीपिकाला सरप्राईज द्यायला थेट तिच्या ऑफिसमध्ये पोहोचला; भेटवस्तूंनी वेधलं लक्ष
रणवीर पुढे म्हणाला, “जेव्हा आम्ही घरी बसून मॅच बघत असतो तेव्हा ते सगळं खूपच भारी असतं. योगायोगाने माझा चांगला मित्र आर्सेनलचे चाहता आहे. एक बार्सिलोनाचा चाहता आहे. आम्हा मित्रांचा एक व्हॉट्सअॅप ग्रुपही आहे जिथे सर्वजण असंच काही ना काही फुटबॉलविषयी बोलत असतो. माझी मेहुणी मॅनचेस्टर युनायटेडची चाहती असल्याने जेव्हा आम्ही मॅनचेस्टर विरुद्ध आर्सेनल मॅच पाहत असतो त्यावेळी खूप मजा येते. मी नशीबवान आहे की माझे बेस्ट फ्रेंड्सही आर्सेनलचे चाहते आहेत.”
आणखी वाचा- “आमच्या वयातील अंतर…” स्वतःपेक्षा लहान असलेल्या गर्लफ्रेंडबद्दल अरबाज खानने पहिल्यांदाच सोडलं मौन
दरम्यान रणवीर सिंगच्या कामाबद्दल बोलायचं तर तो आगामी काळात रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात पूजा हेगडे आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याशिवाय वरुण शर्माही या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय रणवीरकडे ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट आहे. ज्यात अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असून धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आजमी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.