अभिनेता रणवीर सिंह त्याच्या अप्रतिम अभिनयाबरोबरच त्याच्या फॅशनसाठी विशेष ओळखला जातो. मध्यंतरी काही काळ त्याने अतरंगी कपडे घालून लक्ष वेधून घेतलं होतं. रणवीर त्याच्या अभिनयापेक्षा त्याच्या या अतरंगी कपड्यामुळेच जास्त चर्चेत होता. मात्र नंतर त्याने साधे कपडे घालायला सुरुवात केली. त्याने अतरंगी कपडे घालणं का बंद केलं, याबाबत स्वतः रणवीरने ‘कॉफी विथ करण’मध्ये खुलासा केला आहे.
‘या’ अभिनेत्रीने ‘रामलीला’ सोडल्याने लागलेली दीपिका पदुकोणची वर्णी, रणवीर सिंह खुलासा करत म्हणाला…
“पब्लिक इमेजसाठी तुम्हाला काही गोष्टी बदलाव्या असं वाटतं. मी पण वेगळ्या प्रकारचे कपडे घालायचो, जे माझ्या चित्रपट निर्मात्याच्या प्रतिमेला आणि माझ्या वयाला सूट होत नव्हते. हा काय कपडे घालतोय, असंही लोक बोलायचे. आपलं बोलणं झालं तेव्हा तू मला विचारलं होतं की काय करायला हवं. मी तुला रंगीबेरंगी कपडे घालू नकोस, असं म्हटलं होतं. सार्वजनिक जगात वावरताना चित्रपटातील मुख्य हिरो एका विशिष्ट प्रकारचा असावा, विशिष्ट प्रकारचे कपडे घालणारा असावा, असं लोकांचं मत असतं. त्यामुळे ती तुझी ती प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केलास का?” असं करणने रणवीरला विचारलं.
रणवीर म्हणाला, “नाही. कारण मी आयुष्यात अनेक गोष्टींबद्दल लोकांची मतं विचारत असतो, पण मी तेच करतो, जे मला करावं वाटतं. मी रंगीबेरंगी, अतरंगी कपडे घालणं बंद केलं कारण लोकांनी मी कोणते कपडे घातलेत, याबद्दल बोलावं अशी माझी इच्छा नव्हती. लोकांनी माझ्याबद्दल, माझ्या कामाबद्दल, चित्रपटांबद्दल बोलावं असं मला वाटत होतं. खरं तर दीपिकाने मला ही गोष्ट लक्षात आणून दिली. एकदा मी आणि दीपिका बोलत होतो, तेव्हा तिने मला सांगितलं की हे कपडे घातल्यानंतर तू खूप आत्मविश्वासू वाटतोस पण तसं नाहीये. त्यामुळे असे कपडे घालून तू कोण आहेस, त्यावरून लोकांचं लक्ष विचलित करू नकोस.”
पुढे रणवीर म्हणाला, “त्यानंतर मी संजय लीला भन्साळी यांना भेटायला गेलो. तेव्हा मी पूर्ण काळे साधे कपडे घातले होते. मला पाहून ते म्हणाले की ‘तू खूप छान दिसत आहेस. तू आज घातलेल्या साध्या कपड्यांमध्ये तुझ्या चेहऱ्यावर जास्त लक्ष जातंय, त्यामुळे तू असेच कपडे घालायला हवेस’. भन्साळी जे म्हणतात ते मी ऐकतो. त्यानंतर मला वाटलं की मला आता असेच साधे कपडे घालायचे आहेत.”