टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस फेम राखी सावंत मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तिने पती आदिल खानवर मारहाण, फसवणूक यांसारखे गंभीर आरोप केले होते. राखीने केलेल्या आरोपांनंतर पोलिसांनी आदिलला अटक केली होती आणि त्याला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आता आदिल खानच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आदिलच्या विरोधात एका इराणी विद्यार्थिनीने बलात्कार आणि धमकावण्याचे आरोप करत तक्रार दाखल केली आहे.
राखी सावंतचा पती आदिल खानच्या विरोधात मैसूरमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका इराणी विद्यार्थिनीने वीवी पुरम पोलीस ठाण्यात कलम ३७६, ४१७, ४२०, ५०४ आणि ५०६ नुसार बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही इराणी विद्यार्थिनी डॉक्टर ऑफ फार्मसीचं शिक्षण घेण्यासाठी भारतात आली होती. ही विद्यार्थिनी आणि आदिल खान डेझर्ट लॅब फूड अड्डामध्ये पहिल्यांदा भेटले होते. आदिल त्या फूड आउटलेटचा मालक होता. नंतर हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढली.
आणखी वाचा- “सर्व समजल्यानंतर आदिलची बाजू…”, राखीच्या आरोपांवर कथित गर्लफ्रेंडने अखेर सोडलं मौन
इराणी विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार, आदिल खानने तिला लग्नाचं वचन देत मैसूरमधील एका अपार्टमेंटमध्ये तिच्यावर बलात्कार केला. या अपार्टमेंटमध्ये दोघंही एकत्र राहत होते. पाच महिन्यांपूर्वी जेव्हा या विद्यार्थिनीने आदिलला लग्नाची गळ घातली तेव्हा त्याने असं करण्यास नकार दिला आणि त्याने आपले तिच्यासारख्या अनेक तरुणींशी असे संबंध असल्याचं सांगितलं. जेव्हा या तरुणीने त्याला पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली तेव्हा त्याने तिच्या मोबाइलवर दोन वेगवेगळ्या नंबरवरून तिचे काही इंटिमेट फोटो पाठवले.
आणखी वाचा- राखी-आदिल खानच्या वादात एक्स गर्लफ्रेंडचं मोठं वक्तव्य; म्हणाली, “या सगळ्यात माझं…”
आपल्या तक्रारीत संबंधित तरुणीने त्या मोबाईल नंबर्सचाही उल्लेख केला आहे. याशिवाय आदिलने यावरून तिला धमकी दिली की, पोलिसांकडे गेल्यास तो तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल तसेच तिच्या पालकांनाही हे फोटो पाठवेल. एवढंच नाही तर कोणत्याही प्रकारची तक्रार केल्यास आदिलने त्या तरुणीला जीवे मारण्याची धमकीही दिली होती असं तिने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
आणखी वाचा- “…आणि विजेता आहे शिव ठाकरे”, Bigg Boss 16 Finale आधी व्हायरल होतोय ‘तो’ व्हिडीओ
दरम्यान राखी सावंतने आदिल खानवर मारहाण केल्याचे आरोप केले आहे. राखीचा दावा आहे की आदिलने तिच्याशी खूपच वाईट वर्तणूक केली. तिला मारहाण केली. याशिवाय आदिलचे वेगवेगळ्या तरुणींशी विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोपही राखीने केला होता. राखीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. आता त्याच्या विरोधात बलात्काराची तक्रारही दाखल झाली आहे.