Arijit Singh : ‘चन्ना मेरेया’, ‘ओ माही’, ‘हमारी अधुरी कहानी’, ‘गलती से मिस्टेक’ या आणि अशा अनेक गाण्यांनी तसेच आपल्या गोड गळ्याने अरिजित सिंहने सर्वांना मंत्रमुग्ध केलं आहे. त्याने आजवर आपल्या गाण्यांनी लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्याच्या गाण्यांचे सर्वच जण नेहमी भरभरून कौतुक करतात. अरिजित त्याच्या गाण्यांसाठी किती मानधन घेत असेल असा प्रश्न तुम्हालाही कधी ना कधी पडला असेल. अशात आता एका प्रसिद्ध रॅपरने अरिजितच्या मानधनाबाबत एक खुलासा केला आहे.
ऑनेस्टली सेइंग पॉडकास्टमध्ये नुकतेच रॅपर इक्का सिंह आणि रफ्तार या दोघांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी अरिजित त्याच्या अडचणी दूर कसा ठेवतो आणि आपल्या संपत्तीचा दिखावा करण्यापासून नेहमी कसा दूर राहतो याबद्दल सांगितलं. तसेच या पॉडकास्टमध्ये रॅपर इक्का सिंहने अरिजितच्या कमाईबद्दल एक किस्सादेखील सांगितला आहे.
हेही वाचा : Video: प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याने २७ व्या वर्षी उरकला साखरपुडा; सुंदर व्हिडीओ शेअर करून दिली गुड न्यूज
इक्का यावेळी म्हणाला की, “संगीत विश्वातील अनेक कलाकार स्वत:ला श्रीमंत समजतात, ते श्रीमंत असतातही, आम्ही पण त्यांच्यातीलच एक आहोत. मात्र, अरिजित आमच्यासारख्या १०० जणांना जेवणासाठी बोलवू शकतो.” तसेच पॉडकास्टमध्ये गप्पा मारताना इक्का आणि रफ्तार दोघांनीही अरिजितच्या साध्या स्वभावाची तुलना थेट आंतरराष्ट्रीय रॅपर एमिनेमशी केली.
“अरिजितला लग्नसमारंभात गाणं सादर करणं आवडत नाही. मात्र, तरी एकाने त्याला गाणं गाण्यासाठी फार विनंती केली. त्यावर अरिजितने फक्त दीड तास गाणं गायलं आणि या गाण्याचं मानधन म्हणून त्याने थेट मुंबईतलं आलिशान घर घेतलं. विचार करा, मुंबईसारख्या ठिकाणी आलिशान घरांच्या किमती किती जास्त आहेत”, असं इक्का म्हणाला.
इतकंच नाही तर इक्काने अरिजितचा आणखी एक किस्सा सांगितला. तो म्हणाला, “एकदा अरिजितने एका ठिकाणी शो केला, तिथे त्याची कार येण्यासाठी बराच वेळ लागणार होता. त्यावेळी त्याने थेट रिक्षा केली आणि आपलं घर गाठलं.”
हेही वाचा : “पहिल्या चित्रपटानंतर मी बेरोजगार…”, अल्लू अर्जुनचं वक्तव्य; ‘या’ दिग्दर्शकाला दिलं करिअर वाचवण्याचं श्रेय
ए आर रेहमान यांच्याशी केली तुलना
इक्काने पुढे अरिजितची तुलना ए आर रेहमान यांच्याशी केली. तो म्हणाला, “ए आर रेहमान सर त्यांच्या एका लाईव्ह शोसाठी तीन कोटी रुपये मानधन घेतात. तर, अरिजित किती मानधन घेतो बघा. त्याने फक्त दीड तासांसाठी थेट मुंबईतलं घर घेतलं. असं असलं तरी अरिजित त्याच्या संपत्तीचा कधीच दिखावा करत नाही, तो नेहमीच साधं राहणं आणि वागणं पसंत करतो.”