रवीना टंडनची मुलगी राशा थडानी तिच्या आगामी ‘आझाद’ चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात राशा अजय देवगण आणि त्याचा पुतण्या अमन देवगण यांच्याबरोबर झळकणार आहे. राशाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत, पण सध्या एका खास व्हिडीओमुळे ती चर्चेत आहे. या व्हिडीओत ती चित्रपटाच्या सेटवर अभ्यास करताना दिसत आहे.
राशा थडानी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘उई अम्मा’ या गाण्यामुळे चर्चेत आहे. ‘आझाद’ या चित्रपटातील या आयटम सॉन्गमधील तिचे डान्स मूव्ह्ज प्रेक्षकांना खूप आवडले आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. राशा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
सध्या सोशल मीडियावर राशाचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती तिच्या पदार्पणाच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तयार होत असतानाच १२वीच्या बोर्ड परीक्षेची तयारीही करताना दिसते आहे. एका बाजूला मेकअप आर्टिस्ट तिचा मेकअप करत आहे, तर दुसरीकडे हेअर स्टायलिस्ट तिचे केसांची स्टाईल करत आहे. आरशासमोर बसलेल्या राशाचे पूर्ण लक्ष तिच्या पुस्तकांवर केंद्रित आहे.
या व्हिडीओमध्ये कोणीतरी तिला विचारते, “राशा, तू तुझ्या पुढील लाईन्ससाठी तयार आहेस?” त्यावर ती हसत उत्तर देते, “मी अभ्यास करतेय.” ती पुढे म्हणते, “माझ्या बोर्डाच्या परीक्षेला फक्त १० दिवस उरले आहेत, मी भूगोलाचं पुस्तक वाचत आहे.”
हेही वाचा…Aashiqui 3 चित्रपटातून ‘या’ अभिनेत्रीचा पत्ता कट? याआधीच्या बोल्ड भूमिका ठरल्या कारणीभूत
अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘आझाद’ चित्रपटाची निर्मिती रोनी स्क्रूवाला आणि प्रज्ञा कपूर यांनी केली आहे. हा चित्रपट येत्या आठवड्यात, म्हणजेच १७ जानेवारी २०२५ रोजी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.