अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. चित्रपटातील गाणी, संवाद सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांना भावल्या होत्या. आता लवकरच ‘पुष्पा २: द रुल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या वर्षभरापासून चाहते दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. येत्या १५ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना पुन्हा एकदा रश्मिका आणि अल्लू अर्जुनची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.
‘पुष्पा: द राइज’मधील श्रीवल्ली गाण्याने प्रत्येकाच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. रश्मिकाने साकारलेली श्रीवल्ली सगळ्यांच्या मनात घर करून गेली. त्यामुळे दुसऱ्या भागात तिची भूमिका व लूक नेमका कसा असेल याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर रश्मिकाचा ‘पुष्पा २’च्या सेटवरचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होऊन तिचा सुंदर लूक प्रेक्षकांसमोर आला आहे.
‘पुष्पा २’च्या सेटवरच्या व्हायरल व्हिडीओमध्ये श्रीवल्ली फेम रश्मिकाने लाल साडी, भरजरी दागिने, केसात गजरा असा सुंदर आणि पारंपरिक दाक्षिणात्य लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. सेटवर रश्मिकाला श्रीवल्लीच्या रुपात पाहून तिच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. अभिनेत्रीच्या आजूबाजूला चाहत्यांनी सेटवर गर्दी केल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. रश्मिकाने देखील तिच्या सगळ्या चाहत्यांना हसून मोठ्या आनंदाने अभिवादन केलं.
दरम्यान, रश्मिकाच्या या व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सध्या तिचे श्रीवल्लीच्या लूकमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. येत्या १५ ऑगस्ट २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आता पहिल्या भागासारखी ‘पुष्पा’ची जादू पुन्हा एकदा चालणार का याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.