लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी विकी कौशलबरोबरच अभिनेत्री रश्मिका मंदानाचेही (rashmika mandanna) सर्वत्र कौतुक होत आहे. ‘छावा’मुळे रश्मिकाचे सर्वत्र कौतुक होत असतानाच कर्नाटकच्या मांड्या विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार रवी कुमार गनिगा यांनी रश्मिकाबद्दल संताप व्यक्त केला आहे. काँग्रेस आमदार गनिगा यांनी बंगळुरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यास नकार दिल्याचा आरोप केला आणि तिच्यावर टीकादेखील केली. शिवाय ज्या इंडस्ट्रीमधून (कन्नड) तिने कारकिर्दीची सुरुवात केली, त्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल तिला धडा शिकवू नये का? असा थेट सवालही त्यांनी केला.
या प्रकरणानंतर अभिनेत्री नव्या वादात सापडली आहे. तथापि, रश्मिकाच्या टीमने हे सर्व आरोप ‘पूर्णपणे खोटे’ असल्याचे म्हटले आहे. पण, त्यानंतर आमदार गनिगा यांनी ते याबद्दल पुरावे जाहीर करतील असं म्हणत तिला उत्तर दिलं आहे. रश्मिकाच्या जवळच्या सूत्राने तिची भूमिका स्पष्ट करण्यासाठी एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. काही वृत्तांनुसार, या निवेदनात असे म्हटले आहे की, “अनेक बातम्यांमध्ये असा आरोप करण्यात आला आहे की, रश्मिकाने बेंगळुरू फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. तसंच तिने राज्याबद्दल अपमानास्पद विधाने केली आहेत; तर या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत आणि त्यात कोणतेही तथ्य नाही.”
रश्मिकाच्या टीमने केलेले आरोप फेटाळल्यानंतर रवी गनिगा म्हणाले की, “हे रश्मिकाचे विधान नाही, तर रश्मिकाच्या टीमचे विधान आहे. आम्ही रश्मिकाला बंगळुरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमंत्रित केले होते, पण तिने नकार दिला. याचे कागदपत्रे (पुरावे) आम्ही सार्वजनिकपणे जाहीर करू.” पुढे त्यांनी आरोप केला की, अभिनेत्रीला अनेक वेळा आमंत्रित करण्यात आले होते. परंतु, तिने कोणतेही वैध कारण नसताना महोत्सवाला येण्यास नकार दिला.
दरम्यान, ३ मार्च रोजी माध्यमांशी संवाद साधताना गनिगा यांनी म्हटलं होतं की, “रश्मिका मंदानाने ‘किरिक पार्टी’मधून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. गेल्या वर्षी आम्ही तिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आणि रश्मिका या इंडस्ट्रीत वाढलेली असूनही तिने कन्नड भाषेचा अपमान केला, याबद्दल आम्ही त्यांना धडा शिकवू नये का?”