अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडीओ नोव्हेंबर महिन्यात व्हायरल करण्यात झाला होता. त्या डीपफेक व्हिडीओ प्रकरणात मुख्य आरोपीला शनिवारी दिल्ली पोलिसांनी आंध्र प्रदेशातून अटक केली आहे. यापूर्वी तपासादरम्यान बिहारमधील १९ वर्षीय तरुणाची चौकशी केली होती. त्यानंतर आता मुख्य आरोपीला अटक करण्यात आल्याचं वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक मुलगी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत होती. त्या मुलीचा चेहरा हुबेहुब रश्मिकासारखा दिसत होता. या व्हिडीओमध्ये ती मुलगी लिफ्टमध्ये शिरताना दिसत होती आणि तिने अतिशय रीलिव्हिंग ड्रेस घातला होता. हा व्हिडीओ मॉर्फ केलेला होता. या व्हिडीओत दिसणारी मुलगी ही रश्मिका नव्हे तर झारा ही ब्रिटिश-भारतीय वंशाची तरुणी होती. एआयचे डीपफेक तंत्रज्ञान वापरून रश्मिका मंदानाचा चेहरा झाराच्या त्या व्हिडीओवर लावण्यात आला होता.
रश्मिकाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनीही या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली होती. केंद्र सरकारनेही या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर रश्मिकानेही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली होती.
रश्मिका मंदाना काय म्हणाली होती?
“माझा डीपफेक व्हिडीओ ऑनलाइन मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे, हे पाहून मला खूप दुःख झालंय. याबद्दल बोलणं गरजेचं आहे. हे फक्त माझ्यासाठीच धक्कादायक नाही तर आपणा सर्वांसाठीच धक्कादायक आहे, कारण तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जात आहे. एक महिला व एक अभिनेत्री म्हणून मी माझे कुटुंब, मित्र आणि शुभचिंतकांचे आभार मानते कारण ते माझे संरक्षक आणि सपोर्ट सिस्टिम आहेत. पण हे मी शाळा किंवा कॉलेजमध्ये असताना घडलं असतं तर मी हे कसं हाताळलं असतं, याची मला कल्पनाही करवत नाही. इतर अनेक जण अशा प्रकरणाला बळी पडण्यापूर्वी आपण याचा एक समाज म्हणून निषेध करायला पाहिजे,” असं तिने या प्रकरणावर म्हटलं होतं.