नॅशनल क्रश अशी ओळख असलेली रश्मिका मंदाना ही तिच्या ANIMAL या सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आहे. तसंच त्याआधी ती पुष्पा सिनेमातल्या श्रीवल्लीच्या भूमिकेमुळे घराघरांत पोहचली. याच रश्मिकाचे चाहते देशभरात आहेत. तिचं नशीब बलवत्तर म्हणून ती मरता मरता वाचली आहे. रश्मिकानेच यासंदर्भातला फोटो पोस्ट केला आहे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं म्हणत रश्मिकाने हा फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केला आहे. रश्मिकाची ही पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांनीही चिंता व्यक्त केली आहे.
काय आहे रश्मिका मंदानाची पोस्ट?
रश्मिकाने अभिनेत्री श्रद्धा दास बरोबर इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये रश्मिका म्हणते तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगते आहे, अशा प्रकारे आज आम्ही मरता मरता वाचलो आहोत. या फोटोत रश्मिका आणि श्रद्धा दास यांचे फोटो दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रश्मिका, श्रद्धा दास आणि इतर प्रवासी जे या विमानातून प्रवास करत होते त्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. तांत्रिक बिघाड झाल्याने हे लँडिंग करावं लागलं. हे विमान मुंबईहून हैदराबादला जात होतं. विमान हैदराबादच्या दिशेने निघालं होतं. पण तांत्रिक बिघाडामुळे या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. या फोटोमुळे रश्मिकाच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे.
रश्मिका मंदाना अॅनिमल या सिनेमात झळकली होती. त्यामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात पु्न्हा एकदा आली होती. अभिनेता रणबीर कपूरने रणविजय हे पात्र साकारलं होतं. तर रश्मिकाने या सिनेमात गीतांजली हे पात्र साकारलं होतं. याच रश्मिकाने आपला अनुभव सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
हे पण वाचा- वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी ‘अॅनिमल’ फेम रश्मिका मंदानाची मोठी कामगिरी! पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी
रश्मिका सध्या तिच्या पुष्पा २ सिनेमाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. या सिनेमात ती पुन्हा एकदा अल्लू अर्जूनहसह दिसणार आहे. सुकुमार यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. २०२१ मध्ये आलेला पुष्पा द राईज या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. तसंच ब्लॉकबस्टर सिनेमाच्या रांगेत तो जाऊन बसला आता पुष्पाचा दुसरा पार्ट पुष्पा द रुल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.