पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १२ जानेवारी रोजी मुंबईत अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू, या समुद्रावर बांधलेल्या देशातील सर्वात लांब पुलाचं उद्घाटन केलं. मुंबई ते नवी मुंबईला जोडणाऱ्या या पुलामुळे प्रवासादरम्यानचा खूप वेळ वाचतो. हा पूल तयार होण्यापूर्वी मुंबईहून नवी मुंबईला जाण्यासाठी दोन तास लागत होते, तर आता केवळ १५ ते २० मिनिटांत लोक तेथे पोहोचू शकतात. नुकताच दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाने या पुलावरून प्रवास केला. ‘एएनआय’शी संवाद साधताना तिने या अटल सेतूचं कौतुक केलं आहे. अटल सेतूवरून अभिनेत्रीने पहिल्यांदाच प्रवास केला.
मुंबईचा अशाप्रकारे विकास होऊ शकतो याची कुणी कल्पना देखील केली नसल्याचं यावेळी रश्मिका म्हणाली. अभिनेत्री आपलं मत मांडताना सांगते, “आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की हा दोन तासांचा प्रवास आता केवळ २० मिनिटांत पूर्ण होतोय. या पुलामुळे प्रवास एवढा सोयीचा होईल असा विचार देखील कोणी नसेल. गेल्या काही वर्षात झालेल्या विकासामुळे नवी मुंबई ते मुंबई, गोवा ते मुंबई आणि बंगळुरू ते मुंबई हा प्रवास आता खूपच सोपा झाला आहे. या सुविधा पाहून आपल्या देशाचा अभिमान वाटतो. आता विकासाच्या बाबतीत भारताला कोणीही रोखू शकत नाही. गेल्या १० वर्षांत भारतात खूप विकास झाला आहे. देशात प्रत्येक गोष्टीचं नियोजनही चांगल्याप्रकारे चालू आहे.”
हेही वाचा : माधुरी दीक्षितच्या वाढदिवसानिमित्त श्रीराम नेनेंची खास पोस्ट; पत्नीबद्दल म्हणाले, “आम्ही तुझ्यावर…”
अभिनेत्री पुढे सांगते, “आता कोणीही म्हणू शकत नाही की, भारतात असे होऊ शकत नाही. गेल्या १० वर्षांत आपण वेगाने प्रगती केलीये. हा जवळपास २० किलोमीटर लांबीचा पूल अवघ्या ७ वर्षांत पूर्ण झालाय. भारत हा जगातील सर्वात स्मार्ट देश आहे.” याचबरोबर रश्मिका मंदानाने तरुणांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
सहा लेन असलेला हा ट्रान्स हार्बर लिंक रोड २१.८ किमी लांबीचा आहे. या पुलाच्या बांधकामामुळे मुंबई ते नवी मुंबई दरम्यानच्या प्रवासाला दोन तासांऐवजी केवळ १५ ते २० मिनिटे लागत आहेत. डिसेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते या पुलाची पायाभरणी करण्यात आली होती.