ॲनिमल हा सिनेमा डिसेंबर महिन्यात प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणारा हा सिनेमा ठरला. या सिनेमात रश्मिका मंदाना, रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी मुख्य भूमिकांमध्ये आहेत. संदीप वांगा रेड्डीने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमावरुन बरीच उलटसुलट चर्चा झाली. तसंच सिनेमाचा ट्रेलर जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा त्यातल्या एका संवादावरुन रश्मिका मंदानाला चांगलंच ट्रोल करावं लागलं. या ट्रोलिंगवर आता रश्मिकाने मौन सोडलं आहे.
काय होता तो प्रसंग?
ट्रेलरमध्ये जो प्रसंग दाखवण्यात आला होता त्यात रश्मिका मंदाना करवा चौथच्या दिवशी रणबीरवर चांगलीच चिडलेली असते. तसंच रागाच्या भरात ती एक वाक्य बोलून जाते ज्यानंतर रणबीर चिडतो. जे वाक्य ती बोलत असते त्याचा काहीही संदर्भ लागला नसल्याने रश्मिका मंदानाला खूप ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. अगदी ती काय बोलते ते समजत नसल्यापासून ते तिने तोंडात सुपारी ठेवून संवाद म्हटला आहे का? इथपर्यंत अनेक प्रकारे तिला ट्रोल केलं गेलं. या सगळ्या प्रकारावर आता रश्मिकाने मौन सोडलं आहे. नेहा धुपियाच्या नो फिल्टर नेहा या टॉक शोमध्ये रश्मिका आली होती. त्या शोमध्येच तिने या मुद्द्यावर मौन सोडलं आहे.
काय म्हणाली रश्मिका मंदाना?
“करवा चौथचा तो प्रसंग नऊ मिनिटांचा होता. तो सीन शूट करताना सेटवर जितके लोक होते त्या सगळ्यांना आवडला होता. नऊ मिनिटांचं ते शूट संपल्यावर सगळ्यांनीच टाळ्या वाजवल्या. तो सीन खूप चांगल्या प्रकारे शूट झाला असं सगळ्यांनीच सांगितलं. ट्रेलर जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा एका डायलॉगवरुन मला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. तेव्हा मी असा विचार केला की नऊ मिनिटांचा तो इतका लांबलचक सीन सेटवरच्या लोकांना आवडला होता, मग आता लोक आपल्याला ट्रोल का करत आहेत? मी जणू काही स्वतःभोवती एखादा फुगा फुगवून घेतला होता का? लोकांना तो सीन खरंच आवडला नाही का? तुम्ही काय शूट केलं आहे ते लोकांना माहीत नसतं. त्यांनी १० सेकंदाचा तेवढा एक डायलॉग पाहिला आणि मला ट्रोल करायला सुरुवात केली. ” असं रश्मिकाने म्हटलं आहे.
हे पण वाचा- ‘अॅनिमल’नंतर आता तृप्ती डिमरी विकी कौशलसह देणार ‘बॅड न्यूज’, पाहा करण जोहरच्या नव्या चित्रपटाचा पहिला लूक
लोकांनी महिलेला तिच्या शरीरावरुन ट्रोल करणं, बॉडी शेमिंग ज्याला आपण म्हणतो ते मला मुळीच आवडत नाही. आता एखाद्या महिलेच्या शरीरावरुन तिला ट्रोल करता येत नसेल तर चित्रपट, त्यातला पेहराव, त्यातली भाषा, संवाद यावरुन ट्रोलिंग होतं. मी कसा परफॉर्मन्स दिला आहे हे मला माहीत आहे असं रश्मिका मंदानाने म्हटलं आहे.