Rashmika Mandanna Injury : नॅशनल क्रश अशी बिरूद जिच्या नावामागे लागतात अशी अभिनेत्री रश्मिका मंदानाचे (Rashmika Mandanna) ‘अॅनिमल’ आणि ‘पुष्पा २: द रुल’ या ब्लॉकब्लस्टर सिनेमांमुळे आजही कौतुक होते. या अभिनेत्रीचा लवकरच ‘छावा’ (Chhava) हा सिनेमा येणार आहे. मात्र, अलीकडेच जिम करताना तिच्या पायाला दुखापत झाली. २२ जानेवारी २०२५ रोजी तिच्या आगामी ऐतिहासिक नाट्यपट ‘छावा’च्या ट्रेलर लाँचला ती सहभागी झाली होती. सुरुवातीला व्हीलचेअरवर आलेल्या रश्मिकाने नंतर मदतीने स्टेजवर लंगडत जात चित्रपटाचे प्रमोशन केले.
रश्मिकाने नुकतीच इन्टाग्रामवर तिच्या दुखापतीविषयी अपडेट दिली आहे. तिने एक पोस्ट शेअर करत त्यात तिच्या दुखापतीविषयी माहिती दिली आहे. पोस्टच्या सुरुवातीला तिने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारायची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, पुढे तिने पोस्टमध्ये तिच्या दुखापतीबद्दल अधिक माहिती दिली.
रश्मिकाने या पोस्टमध्ये तिच्या पायाला असलेल्या प्लास्टरचा लहान व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर तिच्या मैत्रिणींनी नक्षी काढल्या आहेत. तिने या फोटोसाठी कॅप्शन देत लिहिले, “हे सर्व क्यूट वाटत असले, तरी पायाला आतमध्ये तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहे आणि स्नायू फाटले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून मी जमिनीवर पाय टेकवलेला नाही. मी स्वतःच्या पायांवर उभं राहणं खरंच मिस करतेय. कृपया स्वतःची काळजी घ्या. लोक जेव्हा काळजी घेण्याचा सल्ला देतात, तेव्हा ते हलक्यात घेऊ नका! तुम्हाला खूप प्रेम !”
पाहा पोस्ट –
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटात रश्मिका मंदान्ना महाराणी येसूबाई यांची म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत विकी कौशल असून, मराठा साम्राज्याच्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर आधारित कथा सादर केली गेली आहे. ट्रेलरला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, रश्मिकाचा रॉयल लूक आणि विकीची दमदार भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
‘छावा’नंतर रश्मिका सलमान खानबरोबर ‘सिकंदर’ या चित्रपटात झळकणार आहे. ए. आर. मुरुगदोस दिग्दर्शित हा चित्रपट ईद २०२५ ला प्रदर्शित होईल. तसेच, ती मॅडोकच्या हॉरर कॉमेडी युनिव्हर्समधील आयुष्मान खुराणाबरोबरच्या ‘थामा’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटात दिसणार आहेत.