गेल्या काही दिवसांमध्ये रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले होते. संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली होती. या चित्रपटात रणबीरबरोबर साऊथची सुपरस्टार रश्मिका मंदानाची प्रमुख भूमिका होती. ‘अॅनिमल’मध्ये रश्मिकाने रणबीरच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. दरम्यान, या चित्रपटात रश्मिका रणबीरला रागाच्या भरात चापट मारते, असा एक सीन दाखवण्यात आला आहे. या सीननंतर रश्मिका खूप रडली होती. नुकत्याच एका मुलाखतीत रश्मिकाने याबाबतचा खुलासा केला आहे.
रश्मिका म्हणाली, “हा संपूर्ण सीन एकाच टेकमध्ये शूट करण्यात आला होता. सीनमध्ये काय करायचं आहे हे मला अजिबात माहिती नव्हतं. संदीपनं मला फक्त अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती कशी वागेल याचा तू विचार कर आणि तूसुद्धा तशीच वाग, असं सांगितलं होतं आणि मीसुद्धा अगदी तसंच केलं. मला फक्त एवढंच आठवतंय. त्यानंतर सीन शूट करताना मी काय केलं याबाबत मला काहीच आठवत नाही. रणबीरला चापट मारण्याच्या त्या सीननंतर मी खरंच रडले होते. मी रणबीरला चापट मारली होती. त्याच्यावर ओरडत होते. तो सीन संपल्यानंतर मी रणबीरकडे गेले आणि त्याला तू ठीक आहेस ना, असं विचारलं होतं.”
‘अॅनिमल’ चित्रपटात भरपूर अॅक्शन सीन्स पाहायला मिळाले आहेत. तसेच या चित्रपटात प्रचंड रक्तपात, हिंसा आणि बोल्ड सीन्सदेखील आहेत. ‘अॅनिमल’मध्ये रणबीर कपूरने पहिल्यांदाच हिंस्त्र पात्र साकारले आहे. चित्रपट समीक्षक, तसेच चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांनीही हा चित्रपट आणि या चित्रपटाच्या कथेवर टीका केली आहे.
‘अॅनिमल’ गेल्या वर्षी १ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रणबीर व रश्मिकाबरोबर बॉबी देओल, अनिल कपूर, तृप्ती डिमरी, सुरेश ओबेरॉय यांच्या प्रमुख भूमिका आहेत. जगभरात या चित्रपटाने ८४३ कोटींची कमाई केली आहे.