सध्या बॉलिवूडमध्ये एका मागोमाग एक बायोपिकची निर्मिती होताना दिसत आहे. प्रसिद्ध खेळाडू, अभिनेते, राजकीय नेते यांच्यानंतर आता प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या आयुष्यावर चित्रपट निर्मिती केली जाणार आहे. टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्या बायोपिकवरील संशोधन अंतिम टप्प्यात आलं असून राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुधा कोंगारा या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.
रतन टाटा यांच्या बायोपिकचं काम २०२३ च्या अखेरीस सुरू होणार असल्याचं बोललं जात आहे. “रतन टाटा हे आपल्या देशातील प्रसिद्ध उद्योगपतींपैकी एक आहेत आणि त्यांची कथा रुपेरी पडद्यावर साकारणे ही अभिमानाची बाब आहे,” असं सूत्रांकडून इंडल्ग एक्सप्रेसला सांगण्यात आलं आहे.
आणखी वाचा- “रतन टाटा आणि माझे…” अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी रिलेशनशिपबाबत केला होता मोठा खुलासा
या चित्रपटात रतन टाटा यांच्या जीवनातील वेगवेगळे पैलू दाखवण्यात येणार असून याव्यतिरिक्त अशा अनेक गोष्टींचा उलगडा केला जाणार आहे ज्या सार्वजनिकरित्या लोकांना माहीत नाहीत. त्यांचं आयुष्य जगभरातील प्रत्येक भारतीय व्यक्तीसाठी प्रेरणादायी आहे. या बायोपिकच्या कथेचं काम सुरू असून २०२३च्या अखेरीस या चित्रपटाच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान ‘चेन्नई टाइम्स’च्या वृत्तानुसार, रतन टाटा यांच्या बायोपिकमधील मुख्य भूमिकेसाठी अभिनेता अभिषेक बच्चन तसेच दाक्षिणात्य अभिनेता सूर्या यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. अर्थात यााबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.