Ratan Tata Only Bollywood Film : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. टाटा उद्योग समूह जगभरात पोहोचवण्यात त्यांनी मोलाचं योगदान दिलं. रतन टाटांच्या निधनानंतर सध्या सामान्य लोकांपासून ते मनोरंजन विश्वातील कलाकारांपर्यंत सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत. सुप्रिया पिळगांवकरांनी देखील पोस्ट शेअर करत रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी पोस्ट शेअर करताना अभिनेत्रीने रतन टाटा यांच्या एकमेव निर्मिती केलेल्या चित्रपटात आपण काम केल्याचं म्हटलं आहे. हा चित्रपट नेमका कोण होता जाणून घेऊयात…

रतन टाटा ( Ratan Tata ) यांनी साधारण २० वर्षांपूर्वी त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी पैसे गुंतवले होते. २००४ मध्ये रतन टाटा यांनी चित्रपट निर्मितीमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र, ‘ऐतबार’ हा सायकोलॉजिकल थ्रिलर सिनेमा त्यांनी निर्मिती केलेला पहिला आणि शेवटचा चित्रपट ठरला. यामध्ये ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. त्यांच्यासह या चित्रपटात जॉन अब्राहम, बिपाशा बासू आणि सुप्रिया पिळगांवकर हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकले होते. तर, या चित्रपटाचं दिग्दर्शन विक्रम भट्ट यांनी केलं होतं.

हेही वाचा : Ratan Tata : “एखाद्याला निरोप देताना सहज ‘टा-टा’ म्हणतो…”, रतन टाटांच्या निधनानंतर मनोरंजन विश्वात हळहळ, मराठी कलाकारांच्या भावुक पोस्ट

बॉक्स ऑफिसवर किती कलेक्शन केलं?

रतन टाटा यांनी टाटा इन्फोमीडियाच्या बॅनरखाली ‘ऐतबार’ ( Aetbaar ) चित्रपटाची निर्मिती केली. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. २३ जानेवारी २००४ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला. या चित्रपटाची कथा मनोरुग्ण प्रियकर आणि त्याची मैत्रीण यांच्याभोवती फिरते. यात प्रियकराची भूमिका जॉन अब्राहमने तर, त्याच्या मैत्रिणीच्या भूमिकेत बिपाशा झळकली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाचं बजेट ९.५० कोटी होतं. पण, बॉलिवूड हंगामाच्या अहवालानुसार, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ ४.२५ कोटींचं लाइफटाइम कलेक्शन केलं आहे. या चित्रपटानंतर रतन टाटा यांनी कोणत्याही चित्रपटाची निर्मिती केली नाही. अशा प्रकारे ‘ऐतबार’ हा रतन टाटा निर्मित पहिला आणि शेवटचा चित्रपट ठरला.

हेही वाचा : Ratan Tata : रतन टाटा यांच्या निधनानंतर सिमी गरेवाल यांची भावनिक पोस्ट; म्हणाल्या, “तुमचं जाणं सहन करणं…”

(फोटो: एक्सप्रेस आर्काइव्ह)

सुप्रिया पिळगांवकर रतन टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना लिहितात, “सर, तुमच्याशी संबंधित असलेल्या एका छोट्या गोष्टीचा मला भाग होता आलं ही खरंच मोठी गोष्टी आहे.” दरम्यान, आज ( १० ऑक्टोबर ) दुपारी ३.३० वाजता वरळीतील स्मशानभूमीत रतन टाटा यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.