Ratan Tata Passed Away: भारतातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले आहे. त्यांनी बुधवारी अखेरचा श्वास घेतला. गेले काही दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. याचदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटा यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. पंतप्रधान मोदींसह अनेक राजकीय नेते व कलाकार त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
रतन टाटा यांनी कधीच लग्न केलं नाही, मात्र ते एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते. आयुष्यभर अविवाहित राहिलेले रतन टाटा यांचं नाव एकेकाळी बॉलीवूड अभिनेत्री सिमी गरेवाल यांच्याशी जोडलं गेलं होतं. ‘मेरा नाम जोकर’, ‘सिध्दार्थ’, ‘साथी’, ‘हाथ की सफाई’, ‘नमक हराम’ असे सुपरहिट चित्रपट करणाऱ्या सिमी व रतन टाटा प्रेमात होते. त्यांना लग्नही करायचं होतं, पण काही कारणांनी ते वेगळे झाले होते. खुद्द सिमी यांना एका मुलाखतीत रतन टाटा यांच्याबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यांनी रतन टाटा हे परफेक्ट आहेत, असं म्हटलं होतं.
हेही वाचा – Ratan Tata Death : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन; ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
काय म्हणाल्या होत्या सिमी गरेवाल?
ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सिमी यांनी रतन टाटांबरोबर असलेल्या रिलेशनशिपबद्दल खुलासा केला होता. “रतन टाटा आणि माझे फार पूर्वीपासूनचे नाते होते. ते परफेक्ट आहेत. त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला आहे. ते एकदम सज्जन गृहस्थ आहेत. त्यांच्यासाठी पैसा कधीच महत्त्वाचा नव्हता. ते परदेशात फारच आरामात जीवन जगतात, निवांत असतात; भारतात मात्र ते खूप व्यग्र असतात,” असं सिमी गरेवाल म्हणाल्या होत्या.
“मी चांगलं दिसणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमात लगेच पडते ही माझी समस्या आहे. मी पुरुषांच्या बाबतीत अशीच आहे, पण आता मी बदलत आहे. मला विनोदी आणि दयाळू माणसं फार आवडतात. माझे जामनरमधील महाराजांबरोबरही नातेसंबंध होते. ते माझ्या शेजारीच राहायचे. या नात्यामुळे मला प्रेम, मत्सर याबद्दल खूप काही शिकायला मिळाले”, असाही खुलासा सिमी गरेवाल यांनी केला होता.
सिमी गरेवाल यांचा ‘Rendezvous with Simi Garewal’ हा टॉक शो खूप प्रसिद्ध होता. या शोमध्ये उद्योगपती रतन टाटाही सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी त्यांचे खासगी आयुष्य, लग्न, रिलेशनशिप यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली होती.