ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक शाह यांनी १९८२ साली आंतरधर्मीय लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला आता ४२ वर्षे झाली आहेत. नसीरुद्दीन शाहांचं हे दुसरं लग्न होतं. नसीरुद्दीन यांच्याबरोबर चार दशकांच्या संसारानंतर रत्ना यांनी लग्नाबद्दल त्यांच्या कुटुंबाची प्रतिक्रिया कशी होती, याबाबत खुलासा केला आहे. याचबरोबर त्यांनी यशस्वी सहजीवनामागची रहस्यही सांगितली.
‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत रत्ना यांना त्यांच्या आंतरधर्मीय लग्नाबद्दल विचारण्यात आलं. नसीरुद्दीन शाह यांच्याशी लग्न करण्याच्या निर्णयावर तुमच्या कुटुंबियांनी आक्षेप घेतला होता का? असं विचारल्यावर त्या म्हणाल्या, “माझे वडील फार आनंदी नव्हते, पण दुर्दैवाने आमचे लग्न होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. आई आणि नसीर यांचं नातं फार चागंलं नव्हतं. पण कालांतराने त्यात सुधारणा झाली आणि त्यांच्यात मैत्री झाली.”
३२ व्या वर्षी ज्यांच्यावर बॉलीवूडने बायोपिक बनवला त्या श्रीकांत बोल्लांचा प्रेरणादायी प्रवास वाचा…
रत्ना पुढे म्हणाल्या, “आश्चर्याची गोष्ट म्हणजे नसीरच्या कुटुंबात असं काही घडलं नाही. एकदाही कुणी ‘सी’ (कन्व्हर्ट) म्हणजेच धर्मांतर शब्दाचा उल्लेखही केला नाही. माझ्याबद्दल कोणीही काहीच बोललं नाही. मी जशी होते, तसं त्यांनी मला स्वीकारलं. मी खूप नशीबवान आहे, कारण मी अशा अनेक लोकांबद्दल ऐकलंय ज्यांना लग्नानंतर स्थिरावण्यास त्रास होतो. सासरी माझ्या सासू-सासऱ्यांसह त्या सर्वांशी माझी मैत्री झाली जे प्रत्येक परिस्थितीत उदारमतवादी होते.”
या मुलाखतीत रत्ना यांनी नसीरुद्दीन शाहांसोबतच्या नात्यावर भाष्य केलं. “लग्न झाल्यावर एकमेकांचं ऐका. खरं तर एकमेकांशी बोला. मी त्याचा आणि त्याच्या संघर्षांचा माझ्यापेक्षा खूप जास्त आदर करते, कारण मला त्या गोष्टी खूप सहज मिळाल्या होत्या. नसीर अतिशय पारंपरिक, एका विशिष्ट प्रकारची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आला आहे,” असं रत्ना पाठक शाह म्हणाल्या.
Video: माधुरी दीक्षितच्या मोठ्या बहिणीला पाहिलंत का? ‘तो’ खास व्हिडीओ पाहून अभिनेत्रीला अश्रू अनावर
रत्ना यांनी त्यांच्या यशस्वी वैवाहिक जीवनाच्या रहस्यांबद्दल सांगितलं. “नसीरने मला आमच्या नात्याच्या सुरुवातीच्या काळातच सांगितलं होतं की नात्याला पती, पत्नी, प्रेयसी, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड असं लेबल न लावणं ही चांगली कल्पना आहे. जर तुम्ही स्वतःला माणूस समजून तसं वागू शकत असाल तर असे लेबल लावायची गरज नाही. एकमेकांशी संवाद साधा, त्याचा खूप फायदा होतो. आणि सुदैवाने आम्ही आमच्या मुलांबरोबरही याच गोष्टी केल्या,” असं रत्ना पाठक शाह यांनी नमूद केलं.