बॉलीवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी भावंड आहेत, ज्यांचं एकमेकांशी असलेलं बाँडिंग अनेक कार्यक्रमांमधून आपल्याला पाहायला मिळतं. दिग्गज अभिनेत्री रत्ना पाठक शाह व सुप्रिया पाठक या दोघीही सख्ख्या बहिणी आहेत. दोघीही एकमेकींपेक्षा फार वेगळ्या दिसतात. रत्ना मोठ्या तर सुप्रिया लहान आहेत. रत्ना यांनी एका मुलाखतीत बहिणीबरोबरच्या बाँडबद्दल खुलासा केला आहे. यावेळी मी चांगली बहीण होऊ शकले नाही हे मान्य करते, असंही त्या म्हणाल्या. सुप्रियांशी ज्या पद्धतीने वागले, ते वाईट होतं व तिची माफीही मागितली असं रत्ना यांनी म्हटलं आहे.
मी चांगली बहीण होऊ शकले नाही – रत्ना पाठक
“आम्ही एकमेकींपेक्षा खूप वेगळ्या आहोत, पण तरीही माझ्यासारखं कुणीतरी आहे, ही भावना आहे. लहान असताना मी व सुप्रिया खूप भांडायचो. मी चांगली बहीण होऊ शकले नाही. मी सुप्रियासमोर दांडगटपणा करायचे. तिला त्रास देत असे. पण ते सगळं त्या काळातच झालं आणि थांबलं याचा मला आनंद आहे. शारीरिकदृष्ट्या त्रास देणे म्हणजे मारामारी, धाकदपटशा हे एकवेळ ठीक असतं पण मानसिक पातळीवर त्रास देणं आणखी वाईट. मी ते केलं, मान्य करते. हे मी सुप्रियालाही सांगितलं, माफी मागितली. तिनेही मोठ्या मनाने मला माफ केलं,” असं रत्ना पाठक ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या.
बहिणीबरोबरच्या तुलनेबद्दल रत्ना पाठक म्हणतात…
६६ वर्षीय रत्ना म्हणाल्या की त्यांनी जेव्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला तेव्हा स्वतःला कधीच सुंदर समजलं नाही. त्यांना वाटायचं की सुप्रिया पाठक त्यांच्यापेक्षा चांगल्या दिसतात. करिअरच्या सुरुवातीला दोन्ही बहिणींमध्ये झालेल्या तुलनेबद्दल रत्ना पाठक यांनी भाष्य केलं. “मला माझे दात व ओठांमुळे काळजी वाटायची; मी म्हणायचे की माझे डोळे मोठे नाहीत, सुप्रियाला बघा, तिचे डोळे इतके सुंदर आहेत. पण याचा मला नंतर फारसा त्रास झाला नाही, कारण मी इतरांप्रमाणे दिसण्याऐवजी स्वतःला एक परिपूर्ण व्यक्ती बनवण्याकडे लक्ष केंद्रित केलं होतं,” असं रत्ना पाठक यांनी नमूद केलं.
कामाबद्दल बोलायचं झाल्यास रत्ना पाठक शाह शेवटच्या २०२३ मध्ये आलेल्या ‘धक धक’ या चित्रपटामध्ये दिसल्या होत्या. या चित्रपटाची निर्माती तापसी पन्नू होती. या चित्रपटात दिया मिर्झा, फातिमा सना शेख, संजना सांघी यांच्या भूमिका होत्या. दुसरीकडे सुप्रिया पाठक या कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘सत्यप्रेम की कथा’मध्ये अभिनेत्याच्या आईच्या भूमिकेत होत्या. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.