ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह व त्यांच्या पत्नी रत्ना पाठक शाह हे बॉलीवूडमधील एकेकाळचं लोकप्रिय जोडपं. दोघे अजुनही इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. त्यांनी चार दशकांपूर्वी आंतरधर्मीय प्रेमविवाह केला होता. पण खरं तर त्यापूर्वी नसीरुद्दीन शाहांचं एक लग्न झालं होतं आणि त्यांना मुलगीही होती. नंतर ते पत्नीपासून विभक्त झाले होते. लग्नाच्या इतक्या वर्षांनी मागे वळून पाहताना रत्ना यांनी नसीरुद्दीन यांच्या पहिल्या लग्नाबाबत त्यांचं मत मांडलं आहे.
‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत रत्ना यांनी नसीरुद्दीन शाह यांच्याबरोबरच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितलं. “आम्ही एकत्र नाटक करत होतो. त्याचं नाव ‘संभोग से संन्यास तक’ असं होतं. त्यानंतर लवकरच आम्हाला वाटलं की आम्हाला एकत्र राहायचं आहे. आम्ही मूर्ख होतो, आम्ही एकमेकांना जास्त प्रश्न विचारले नाहीत. आज लोक खूप प्रश्न विचारतात. आमचं असं होतं की एकत्र राहणं ही गोष्ट ऐकायला चांगली वाटत आहे, चला राहून बघू आणि नंतर आम्ही आयुष्यभरासाठी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला,” असं रत्ना पाठक शाह म्हणाल्या.
नसीरुद्दीन शाह यांचे रत्ना पाठक यांना भेटण्यापूर्वी लग्न झाले होते. हे कळाल्यावरही त्यांच्या भूतकाळाचा आपल्या भावनांवर कोणताही परिणाम झाला नाही, असं त्या सांगतात. “मला त्याच्या भूतकाळातील आयुष्याची चिंता नव्हती, मी प्रेमात होते. तो त्याच्या पहिल्या पत्नीपासून बराच काळ वेगळा राहत होता. त्याचे इतर अनेक रिलेशनशिप होते. ते सगळं भूतकाळात घडलं, मग मी आले आणि जोपर्यंत मी त्याच्या आयुष्यात शेवटचे आहे तोपर्यंत मी ठीक आहे,” असं त्या म्हणतात.
“मी माझ्या इतर मित्र-मैत्रिणींचे वैवाहिक आयुष्य पाहत होते, पण आमच्या जीवनात तसं काहीच नव्हतं. आमच्या लग्नाच्या एका आठवड्यानंतर आम्ही हनिमूनला गेलो आणि मध्येच परत आलो, नसीरने ‘जाने भी दो यारो’चे शूटिंग सुरू केले. बरेच दिवस आम्ही भेटलो नव्हतो. ते खूप कठीण शूट होते. नसीर जायचा आणि तीन दिवसांनी परत यायचा. तो जिवंत आहे, मेला की कोणासोबत पळून गेला हे देखील मला माहित नसायचं,” अशी आठवण रत्ना पाठक यांनी सांगितली.
दरम्यान, नसीरुद्दीन शाह व रत्ना पाठक यांच्या लग्नाला ४१ वर्षे झाली आहेत. दोघांनी १९८२ मध्ये प्रेमविवाह केला होता. रत्नांच्या कुटुंबाला सुरुवातीला नसीर यांच्या आधीच्या लग्नाबद्दल आक्षेप होता. त्यामुळे त्यांच्याकडून लग्नासाठी होकार मिळवण्यास बऱ्याच अडचणी आल्या होत्या.