शाहरुख खानचा ‘पठाण’ आणि त्यात भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये थिराकणारी दीपिका पदूकोण हा सध्या वादाचा विषय बनला आहे. काही सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी चित्रपट बॉयकॉट करायची मागणी केली आहे. यावर सगळ्याच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. काही मंडळी शाहरुखला पाठिंबा देत आहेत तर काही या चित्रपटाला विरोध करत आहेत. बॉलिवूडकरदेखील यावर व्यक्त होत आहेत. त्यांनीदेखील हा वाद बिनबुडाचा आहे असं स्पष्ट केलं आहे.
आता अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांनीदेखील या वादावर त्यांचं मत व्यक्त केलं आहे. ही द्वेषाची भावना कधी संपुष्टात येणार याची त्या वाट पाहत आहेत. शिवाय चित्रपटसृष्टीला सध्या बऱ्याचदा अशा वादाला सामोरं जावं लागतंय हे खूप दुर्दैवी आहे असंही त्यांनी सांगितलं. रत्ना पाठक लवकरच गुजराती चित्रपटात पदार्पण करणार आहेत, त्यांच्या या आगामी ‘कच्छ एक्सप्रेस’ या चित्रपटानिमित्त त्यांनी इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधला.
आणखी वाचा : जान्हवी कपूर पुन्हा दिसली एक्स बॉयफ्रेंडसह; महाराष्ट्राच्या राजकीय कुटुंबाशी आहे त्याचा संबंध
यावेळी या गाण्यावरून निर्माण झालेल्या वादाबद्दल त्या म्हणाल्या, “आपल्या देशात लोकांच्या ताटात खायला अन्न नाहीये, आणि दुसऱ्या व्यक्तीने काय कपडे परिधान केले आहेत यावर टीका करायला सगळे पुढे आहेत.” पण रत्ना ह्या खूप आशावादी आहेत आणि हे दिवससुद्धा जातील असं त्यांचं म्हणणं आहे. त्या म्हणतात, “मला खात्री आहे कि अजूनही आपल्या आसपास सुजाण लोक आहेत. ते यातून बाहेर यायला नक्कीच मदत करतील. कारण ज्या प्रकारचं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे ते फार काळ टिकणारं नाही. मला वाटतं मनुष्य एका मर्यादेच्या पलीकडे द्वेष सहन करू शकत नाही. लवकरच यातून आपण सगळे बाहेर येऊ, त्या दिवसाची मी वाट बघत आहे.”
रत्ना पाठक शाह यांचा ‘कच्छ एक्सप्रेस’ ६ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याचं दिग्दर्शन विरल शाह यांनी केलं आहे. शाहरुख आणि दीपिकाचा ‘पठाण’सुद्धा जानेवारी महिन्यात २५ तारखेला प्रदर्शित होणार आहे. शाहरुख या चित्रपटातून तब्बल ४ वर्षांनी पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.