९० च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे रवीना टंडन होय. रवीना अवघी २१ वर्षांची असताना तिने दोन मुली दत्तक घेतल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता, तर काहींनी मात्र नकारात्मक टिप्पण्या केल्या होत्या. रवीनाच्या या मुली आता मोठ्या झाल्या आहेत, तसेच तिची स्वतःची मुलं राशा व रणबीरही मोठी झाली आहे. राशाने दत्तक बहिणींबद्दल वक्तव्य केलं आहे, ती काय म्हणाली? जाणून घेऊयात.

रवीना टंडन फक्त २१ वर्षांची होती, जेव्हा तिने पूजा व छाया या मुलींना दत्तक घेतलं होतं. त्यानंतर काही वर्षांनी तिने २००४ मध्ये अनिल थडानीशी लग्न केलं. अनिल व रवीनाला राशा व रणबीर ही दोन अपत्ये झाली. रवीना एकदा म्हणाली होती की पूजा व छाया रणबीर आणि राशा यांच्यासाठी मोठ्या बहिणी आहेत. आता राशाने एका मुलाखतीत दोन्ही दत्तक बहिणींबरोबरच्या नात्याबद्दल भाष्य केलं. चार भावंड जेव्हा एकत्र असतो तेव्हा दोन टीम होतात. ज्यात छाया आणि रणबीर एका बाजूला असतात आणि पूजा व राशा दुसऱ्या टीममध्ये असतात, असं राशाने सांगितलं.

राशा फेमिनाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली की ती चार भावंड एकत्र असतात तेव्हा खूप वेडेपणा करतात. “फक्त आणि फक्त वेडेपणा. छाया दीदी आणि रणबीर कदाचित थोडे शांत आहेत, पण पूजा दीदी आणि मी, आम्ही त्यांच्याविरोधात एकत्र येऊन आणि त्यांच्याशी वाद घालून भांडू शकतो,” असं राशाने सांगितलं. राशाने नुकतंच ‘आझाद’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.

जेव्हा मुलींना दत्तक घेतल्यावर झालेल्या टीकेला रवीनाने दिलेलं उत्तर

रवीनाने पूजा आणि छाया यांना दत्तक घेतलं तेव्हा त्या ८ आणि ११ वर्षांच्या होत्या. पूर्वीच्या एका मुलाखतीत रवीनाने सांगितलं होतं की तिने या मुलींना दत्तक घेतल्यावर कशा विचित्र गोष्टी बोलल्या गेल्या. या रवीनाच्याच मुली असून लग्नाआधीच तिने त्यांना जन्म दिलाय, असं म्हटलं गेलं होतं. “जेव्हा तुम्ही असं काहीतरी करता, तेव्हा नेहमीच असे ट्रोल असतील किंवा कोणीतरी सेक्सिस्ट कमेंट्स करतात. विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. मला एक लेख आठवतोय ज्यात म्हटलं होतं की ही तिचीच लपवलेली मुलं असावीत, जी तिला अफेअरमधून झाली असावीत. जेव्हा मी २१ वर्षांची होते, तेव्हा त्या आठ आणि ११ वर्षांच्या होते. तर, मग मी त्यांना जन्म केव्हा दिला? मी ११ किंवा १२ वर्षांची होते तेव्हा?” असा सवाल एका मुलाखतीत रवीनाने उपस्थित केला होता.

लेहरान रेट्रोला दिलेल्या मुलाखतीत रवीनाने तिच्या दत्तक मुलींबरोबरच्या प्रेमळ नात्याबद्दल सांगितलं. “ही आयुष्यभराची कमिटमेंट आहे आणि ही नाती आयुष्यभरासाठी आहेत. आमच्या नात्यात प्रेम आहे आणि भावना आहेत आणि त्यात आम्ही सर्व गुंतलेले आहोत. त्या माझ्या धाकट्या मुलांच्या मोठ्या बहिणी आहेत,” असं रवीना म्हणाली होती.

Story img Loader