प्रख्यात चित्रपट निर्माते व रवीना टंडनचे वडील रवी टंडन यांच्या जयंतीनिमित्त भारतीय चित्रपट उद्योगातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेण्यात आली आहे. जुहू येथील चौकाला रवी टंडन यांचे नाव देण्यात आले आहे. चौकाच्या नामकरण सोहळ्याचे अनावरण त्यांच्या पत्नी वीणा टंडन यांच्या हस्ते करण्यात आले. या खास सोहळ्याला रवीना टंडन देखील उपस्थित होती आणि या खास क्षणाची साक्षीदार बनली.
रवी टंडन यांच्या ८८ व्या जयंतीच्या एक दिवस आधी या चौकाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. रवी टंडन यांनी निर्माते म्हणून भारतातील सिनेसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. या योगदानाची दखल घेत जुहूमधील एका चौकाला त्यांचं नाव देण्यात आलंय.
या कार्यक्रमात रवीना खूप भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. “माझ्या वडिलांचा वारसा कायमस्वरूपी जपला जाईल, याचा मला खूप आनंद आहे. एक अष्टपैलू, ट्रेंड सेट करणारे चित्रपट निर्माते म्हणून चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान खरोखरच महत्त्वपूर्ण आहे. मुंबईत त्यांचे नाव एका चौकाला दिलं जाणं हे त्यांच्या मेहनत, कठोर परिश्रम आणि समर्पणाचा पुरावा आहे. त्यांचे नाव अशा प्रकारे अमर झालेले पाहून माझे हृदय अभिमानाने भरून येते,” असं रवीना म्हणाली.
‘महाभारत’ मधील ‘कृष्णा’चे IAS अधिकारी असलेल्या एक्स पत्नीवर गंभीर आरोप, पोलिसांत तक्रार देत म्हणाले…
रवीना पुढे म्हणाली, “इंडस्ट्री आणि मुंबई शहराने त्यांच्याबद्दल दाखवलेल्या प्रेम आणि आदराबद्दल मी कृतज्ञ आहे. त्यांचा वारसा पुढे नेला जाईल, याचा मला अभिमान आहे. जेव्हा लोक माझ्या वडिलांबद्दल बोलतात तेव्हा ते त्यांचे अष्टपैलुत्व, कलेबद्दलचे त्यांचे समर्पण आणि चित्रपट-संगीताची त्यांची चांगली समज याबद्दल बोलतात. त्यांच्या योगदानाने आणि कामाने सिनेजगतावर दीर्घकाळ प्रभाव टाकला आहे. ते नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहिले नसले तरी त्यांचा प्रभाव आजही दिसून येतो. त्यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल मी कृतज्ञ आहे.”