१९९० च्या दशकात बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींनी आपल्या सौंदर्यासह, डान्स आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. १९९० च्या दशकातील बऱ्याच अभिनेत्री या सामान्य कुटुंबातून बॉलीवूडमध्ये आल्या. त्यांनी आपल्या मेहनत आणि समर्पणामुळे इंडस्ट्रीत स्वतःची ओळख निर्माण केली. माधुरी दीक्षितसारख्या अभिनेत्रीचे नाव या यादीत सर्वांत वर आहे. मात्र, बॉलीवूडमध्ये १९९० च्या दशकात सामान्य कुटुंबातून वर येऊन माधुरी दीक्षितलाही टक्कर देणारी अभिनेत्री होती रवीना टंडन. तिचा पहिलाच सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर तिने एकाच वर्षात आठ सुपरहिट सिनेमे दिले होते.
अभिनेत्री रवीना टंडनने सलमान खानबरोबर बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. पुढे तिने अक्षय कुमारबरोबर काही सिनेमे केले; पण तिची खरी जोडी गोविंदाबरोबर जमली.
कचरा साफ करण्यापासून अभिनयापर्यंतचा प्रवास
रवीना टंडनने आपल्या करिअरची सुरुवात १९९१ मध्ये सलमान खानबरोबर ‘पत्थर के फूल’ या चित्रपटातून केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. अभिनेत्री होण्याआधी रवीना सामान्य मुलगी होती. तिच्या आयुष्यात भरपूर संघर्ष आणि मेहनत होती. एका मुलाखतीत तिने सांगितले की, सुरुवातीच्या काळात तिला स्टुडिओमधील मजला पुसणे आणि उलटी साफ करण्याचे काम करावे लागले.
दहावीत असतानाच सुरू केला संघर्ष
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत रवीना म्हणाली, “दहावीमध्ये असतानाच मी काम करायला सुरुवात केली. त्या वेळी मी स्टुडिओमधील मजला पुसायची आणि उलटी साफ करायची. मी प्रल्हाद कक्कर यांची सहायक म्हणून काम करीत होते. अभिनय क्षेत्रात येण्याचा माझा कोणताही विचार नव्हता.”
हेही वाचा…सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…
बॉक्स ऑफिसवर राज्य करणारी अभिनेत्री
१९९४ हे वर्ष रवीनासाठी सुवर्णकाळ ठरले. त्या वर्षी तिचे १० चित्रपट प्रदर्शित झाले, त्यापैकी आठ चित्रपट सुपरहिट ठरले. त्या वर्षी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारे चार चित्रपट रवीनाचे होते.
रवीनाने शाहरुख खानच्या ‘डर’ला दिला होता नकार
रवीना टंडनने ‘डर’ या शाहरुख खानच्या सुपरहिट चित्रपटाला नकार दिला होता. त्यानंतर तिने शाहरुखबरोबर दोन चित्रपट केले; पण ते दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले.
हेही वाचा…वडील घरी आले की घाबरून लपायचो, ऋषी कपूर कारण सांगत म्हणालेले, “ते खोलीत…”
अक्षय कुमारबरोबरच्या अफेअरच्या अफवा आणि ओटीटीवर कमबॅक
२००६ मध्ये रवीना टंडनने अभिनयातून ब्रेक घेतला. काही काळानंतर तिने ओटीटीवर दमदार कमबॅक केले. अक्षय कुमारबरोबर रवीना टंडनचे नाव अनेकदा जोडले गेले. रवीनाने २००४ मध्ये अनिल थडानी यांच्याशी लग्न केले.