बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन सध्या सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रवीना टंडनने प्रसारमाध्यमाकडून पुरुष आणि महिला कलाकारांची ओळख सांगताना केल्या जाणाऱ्या भेदभावाकडे लक्ष वेधलं आहे. ‘केजीएफ २’ मधील आपल्या दमदार अभिनयामुळे चर्चेत आलेल्या रवीनाने माधुरी दीक्षितला नव्वदच्या दशकातील सुपरस्टार असं म्हणण्यावर आक्षेप घेतला आहे. यावेळी तिने अभिनेता सलमान खान आणि आमिर खानच्या नावाचाही उल्लेख केला आहे.
अलिकडेच ‘हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समिट २०२२’मध्ये बोलताना रवीना टंडन म्हणाली, “जेव्हा आमिर खान २-३ वर्षांच्या ब्रेक घेतो आणि पुन्हा चित्रपटात काम करतो तेव्हा याला त्याचं पुनरागमन किंवा ९० च्या दशकातील सुपरस्टार आमिर खान आता आपल्याबरोबर आहे असं म्हटलं जात नाही. आम्ही अभिनेत्रीही सातत्याने काम करतो पण मी अनेक आर्टिकल्समध्ये वाचलं आहे, ‘९० च्या दशकातील सुपरस्टार माधुरी दीक्षित आता हे करतेय किंवा ते करतेय’ असं लिहिलेलं असतं.”
रवीना टंडन पुढे म्हणाली, “माधुरी दीक्षितने बॉलिवूडमध्ये बराच काळ काम केलं आहे. मग तिला ‘९० च्या दशकातील सुपरस्टार’ असं लेबल देण्यात काय अर्थ आहे. ती आताही काम करतेय तर मग तिला इतर पुरुष कलाकारांप्रमाणे का वागणूक दिली जात नाही?” रवीना टंडनच्या मते आता पुरुष आणि महिला कलाकारांमधील असमानता संपायला हवी आहे. “तुम्ही अशाप्रकारे सलमान खान, संजय दत्त किंवा आमिर खान यांच्याबद्दल असं बोलत नाही मग महिला कलाकारांबद्दलही असं बोलणं आता थांबवायला हवं.” असंही रवीनाने या मुलाखतीत सांगितलं.
आणखी वाचा- “तो मला रक्ताने…”; रवीना टंडनचा ‘या’ व्यक्तीबद्दल धक्कादायक खुलासा
दरम्यान रवीना टंडनच्या कामाबद्दल बोलायचं तर ती आगामी काळात संजय दत्त, पार्थ समथान आणि खुशाली कुमार यांच्याबरोबर ‘घुडचडी’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. फॅमिली ड्राम असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन बिनॉय गांधीने केलं आहे. तर निर्मिती टी- सीरिज आणि किप ड्रिमिंग पिक्चर्सची आहे. याशिवाय अरबाज खानच्या आगामी सोशल ड्रामा ‘पटना शुक्ला’मध्येही ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.