रवीना टंडनची वेब सीरिज ‘कर्मा कॉलिंग’ (रवीना टंडन वेब सीरिज कर्मा कॉलिंग) २६ जानेवारी रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली. रुची नरेनने दिग्दर्शित केलेली ही सीरिज ‘रिव्हेंज’ या अमेरिकन वेब सीरिजचे हे हिंदी रूपांतर आहे. याच्या प्रमोशनदरम्यान शाहरुख खानचा उल्लेख करत रवीना टंडने एका मोठ्या गोष्टीचा खुलासा केला. रवीनाने सांगितले की, तिला शाहरुखबरोबर ४ चित्रपटांची ऑफर आली होती पण काही ना काही कारणाने काही चित्रपट रखडले तर काही चित्रपट रवीनाने सोडले.
शाहरुख खानबरोबर काम करण्याच्या बऱ्याच संध्या हुकल्याबद्दल रवीनाने नुकतंच भाष्य केलं आहे. रवीना म्हणाली की शाहरुखबरोबर अजूनही तिची घनिष्ट मैत्री आहे, पण त्यांनी कधीच एकत्र स्क्रीन शेअर केली नाही याची खंतही तिला आहे. याविषयी बोलताना रवीना म्हणाली, “शाहरुखबरोबरचा एक चित्रपट बंद झाला कारण दिग्दर्शकाचे निधन झाले. दुसऱ्या चित्रपटाला मी नकार दिला कारण त्यातले कॉस्च्युम मला पसंत पडले नव्हते. आम्ही ‘जमाना दिवाना’ केला पण तोही लांबणीवर पडला.”
आणखी वाचा : “लोकांना त्यांच्या मनासारखा…” प्रेक्षक व टीकाकारांना ‘अॅनिमल’ फेम संदीप रेड्डी वांगा यांचं सडेतोड उत्तर
याबरोबरच शाहरुखच्या ‘डर’साठी यश चोप्रा यांनी रवीनाला विचारणा केली होती. परंतु चित्रपटातील काही सीन्स करण्यासाठी रवीना तितकीशी उत्सुक नव्हती अन् त्यामुळेच तिने ही भूमिका नाकारली व शेवटी ती भूमिका जुही चावलाकडे गेली. यानंतर करण जोहरने रवीनाला शाहरुखच्या ‘कुछ कुछ होता है’मधील राणी मुखर्जीची भूमिकाही ऑफर केली होती. परंतु ही भूमिका करायलाही रवीनाने नकार दिला.
‘दी लल्लनटॉप’शी संवाद साधताना रवीनाने या गोष्टींचा खुलासा केला. इतकंच नव्हे तर ‘कुछ कुछ होता है २’मध्ये काम करायची इच्छाही रवीनाने बऱ्याचदा व्यक्त केली आहे. नुकतंच रवीनाला चित्रपटसृष्टीत ३३ वर्षे पूर्ण झाली आहेत. १९९१ च्या ‘पत्थर के फूल’ या चित्रपटापासून तिने तिच्या करिअरची सुरुवात केली होती. सध्या रवीना चित्रपटांबरोबरच ओटीटीवरही वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहे.