अभिनेत्री रवीना टंडन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिच्या कुटुंबाबरोबरचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतेच. शिवाय आयुष्यातील अनेक छोट्या-छोट्या गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असते. आता तिने लेक राशा थडानीच्या शाळेतील काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यासोबत तिने खूप सुंदर आणि थोडं भावूक होणारं कॅप्शन दिलंय.
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने आपल्या मुलीसोबतचा एक अभिमानाचा क्षण शेअर केला आहे. रवीनाची मुलगी राशा हिचं शालेय शिक्षण पूर्ण झालंय. त्यासाठी रवीनाने पतीबरोबर धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये हजेरी लावली होती. तिथले काही फोटो शेअर करत रवीना म्हणाली, “२०२३च्या वर्गाला निरोप देत आहोत. प्रत्येक आई-वडिलांसाठी आपल्या मुलांना मोठं होताना पाहणं हा एक भावूक क्षण आहे. मुलं आता घरट्यातून बाहेर पडण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. मुलं किती मोठी झाली आहेत.”
रवीना टंडनने उद्योगपती अनिल थडानीशी २००४ मध्ये लग्न केलं होतं आणि त्यांना राशा आणि रणबीर थडानी ही दोन मुलं आहेत. याशिवाय रवीनाने पूजा आणि छाया या आणखी दोन मुलींना दत्तक घेतले होते, त्यांची लग्न झाली आहेत. त्यांनाही मुलं झाली असून रवीना आजी झाली आहे.