Raveena Tondon : महाकुंभमेळ्यातील सांगता महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच २६ फेब्रुवारीला झाली. प्रयागराजच्या कुंभमेळ्यातील स्नानासाठी अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती दर्शवली होती. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक राजकारणी, नेते आणि अनेक दिग्गज लोकही या स्नानासाठी येऊन गेले. यातलंच एक नाव होतं कतरिना कैफचं. कतरिना कैफने कुंभस्नान केलं त्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. मात्र त्या दरम्यानची एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. कतरिना कैफ कुंभ स्नान करत असताना दोन तरुणांनी चोरुन तिचा व्हिडीओ काढला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. ज्यानंतर अभिनेत्री रविना टंडनने या दोघांना झापलं आहे.

नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत दोन पुरुष स्वत:चा व्हिडीओ रेकॉर्ड करताना दिसत आहेत. त्यानंतर ते कॅमेरा कतरिनाकडे वळवतात. या पुरुषांच्या मागेच कतरिना संगममध्ये स्नान करत असते. तिच्याकडे कॅमेरा फिरवून एक जण म्हणतो, “हा मी आहे, हा माझा भाऊ आहे आणि ही कतरिना कैफ आहे.” हे ऐकताच त्याच्या आजूबाजूचे लोक हसू लागतात. काहींना हा व्हिडीओ हास्यास्पद वाटला तरी अनेकांनी त्यावरून टीका केली आहे. महाकुंभसारख्या पवित्र ठिकाणी अशा पद्धतीचं वागणं पाहून नेटकऱ्यांनी संबंधितांना सुनावलं आहे. मात्र अभिनेत्री रवीना टंडनने या दोघांना चांगलंच झापलं आहे. तसंच खडे बोलही सुनावले आहेत.

काय म्हटलं आहे रवीना टंडनने?

हा व्हिडीओ आणि घडलेला हा प्रकार अत्यंत घृणास्पद आणि लाज आणणारा आहे. अशा प्रवृत्तीचे लोक शांत आणि अर्थपूर्ण मानल्या जाणाऱ्या क्षणाला दुषित करतात, असं तिने लिहिलं. इतरांनीही त्यावर टीका केली आहे. ‘अत्यंत वाईट… हे अनेक अर्थांनी अनादर करणारं आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘हे अत्यंत लज्जास्पद आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. या व्हिडीओवर लोक कमेंट करत आहेत आणि हा व्हिडीओ पोस्ट करणाऱ्यांना नावं ठेवत आहेत. व्हिडीओ शूट करणाऱ्यांना समाजशास्त्र कळतं का? असं एकाने विचारलं आहे. भारताची ही काळी बाजू आहे असंही एकाने कमेंट करत म्हटलं आहे. या लोकांमुळे हिंदू धर्माची खिल्ली उडवली जाते आहे. अशा प्रकारच्या या व्हिडीओवर कमेंट लोक लिहित आहेत.

इन्स्टाग्रामवर व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ एका इन्स्टाग्राम प्रोफाइलवरुन शेअर करण्यात आला आहे. त्यावर रवीनाने कमेंट करत ही बाब घृणास्पद आणि लज्जास्पद आहे असं म्हटलं आहे. महाकुंभमेळ्याची सांगता २६ फेब्रुवारीला झाली. या कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी विकी कौशल, कतरिना कैफ, सोनाली बेंद्रे, गुरु रंधावा, जुही चावला, प्रीती झिंटा, अक्षय कुमार, राजकुमार राव अशा अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती होती.

Story img Loader