रवी किशन किरण रावच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. या चित्रपटाच्या निमित्तानं दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी वडिलांबरोबरच्या नात्याबद्दल सांगितलं. रामलीलामध्ये अभिनय करण्यास सुरुवात केल्यावर वडील खूप रागावले होते. पण नंतर मात्र आपण सिनेसृष्टीत करिअर केल्यावर त्यांना माझा खूप अभिमान वाटत होता, असं रवी किशन यांनी सांगितलं.
‘ब्रुट’ला दिलेल्या एका मुलाखतीत रवी किशन यांनी खुलासा केला की वडिलांच्या रागामुळे त्यांना १७ व्या वर्षी घरातून पळून जावं लागलं होतं. “माझे वडील मला खूप मारत होते, ते मला हातोड्याने मारायचे. त्यांना माझा खून करायचा होता आणि माझ्या आईला माहित होतं की बाबा मला मारू शकतात. ते माझा जीव घेण्यास मागेपुढे पाहणार नाही. त्यामुळे आई मला म्हणाली की ‘पळून जा’. खिशात ५०० रुपये घेऊन मी घर सोडलं आणि मुंबईला जाणारी ट्रेन पकडली होती,” असं रवी किशन म्हणाले.
रवी किशन यांनी वडिलांच्या अशा वागणुकीचं समर्थनही केलं. “ते पुजारी होते आणि ब्राह्मण असल्याने मी शेती करावी किंवा पुजारी व्हावं किंवा सरकारी नोकरी करावी अशी त्यांची इच्छा होती. आपल्या कुटुंबात एखादा कलाकार जन्माला येऊ शकतो, असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं. त्यामुळे मी रामलीलामध्ये नाचणं किंवा सीतेची भूमिका साकारणं त्यांच्यासाठी थोडं धक्कादायक होतं. ते मारायचे पण त्यांच मारणं हा माझ्यासाठी धडा होता, त्यांनीच रवी किशनला घडवलं,” असं ते म्हणाले.
“तिने मला जवळ ओढलं अन्…”, विजय वर्माने सांगितला सारा अली खानसोबत इंटिमेट सीन करण्याचा अनुभव
मुंबईत आल्यानंतर रवी किशन अभिनयक्षेत्रात वळले. त्यांनी भोजपुरीसह हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आणि नाव कमावलं. शेवटी माझे वडील माझ्या यशावर आनंदी झाले होते, कारण मी भरपूर पैसे कमवू लागलो होतो. मरण्यापूर्वी त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते आणि मला तुझा खूप अभिमान वाटतो, असं ते म्हणाले होते, अशी आठवण रवी किशन यांनी सांगितली.