अभिनेते रवि किशन, यांनी ४५० हून अधिक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे, तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात अनुभवलेल्या कास्टिंग काउचबद्दल खुलासा केला. ते म्हणाले की त्यांनी किशोरवयात बिहारमधील गाव सोडून मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. लहानपणापासून त्यांनी खूप गरिबी पाहिली होती, त्यामुळे ते काम मिळवण्यासाठी खूपच प्रयत्नशील होते. या काळात काही लोकांनी त्यांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी संयम राखला आणि त्यांच्या मागण्यांना कधीच बळी पडले नाहीत.
शुभांकर मिश्रा यूट्यूब चॅनेलवरील एका मुलाखतीत रवि किशन यांना विचारण्यात आले की, फिल्म इंडस्ट्रीत पुरुषही लैंगिक अत्याचारांचे बळी ठरतात का? यावर ते म्हणाले, “जेव्हा तुम्ही तरुण, देखणे असता पण तुमच्याकडे पैसा नसतो, तेव्हा काही लोक तुमचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात. हे फक्त फिल्म इंडस्ट्रीतच नव्हे, तर अनेक क्षेत्रांत घडते. लोक प्रयत्न करतात, आणि त्यांना यश मिळेल अशी अपेक्षा बाळगतात.”
हेही वाचा…‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
ते पुढे म्हणाले, “ तेव्हा मी सडपातळ होतो, माझे केस लांब होते, आणि मी कानात रिंग घालत असे. तरुणपणी मला अशा अनेक प्रकारांना सामोरे जावे लागले. मी सर्वांना सांगू इच्छितो की यश मिळवण्यासाठी कोणतेही शॉर्टकट नाहीत. अशा शॉर्टकटचा प्रयत्न करणाऱ्या अनेक लोकांना मी पाहिले आहे, आणि त्यांना त्याचा प्रचंड पश्चात्ताप झाला आहे. यातील काही जण व्यसनांच्या आहारी गेले, तर काहींनी आपले प्राण गमावले.”
रवि किशन यांनी सांगितले की त्यांनी संयम राखला आणि यश व प्रसिद्धीसाठी सोपी वाट निवडली नाही. ते म्हणाले, “मी कधीही शॉर्टकट पद्धतीने कोणालाही स्टार होताना पाहिलेले नाही. तुमच्या वेळेची वाट पाहा; संयम ठेवा. मी स्वतःला सांगत असे की एक दिवस माझ्यासाठीही सूर्योदय होईल. ९० च्या दशकातील माझे मित्र, अक्षय कुमार आणि अजय देवगण, ते सुपरस्टार झाले. पण मी माझ्या वेळेची वाट पाहिली.”
हेही वाचा…“तुझं लग्न झालंय, दोन मुलं आहेत…”; बोनी कपूर यांनी प्रपोज केल्यावर ६ महिने श्रीदेवी…
रवि किशन अलीकडेच ‘लापता लेडीज’ या चित्रपटात दिसले होते, हा चित्रपट भारताचा ऑस्करसाठी अधिकृत एंट्री म्हणून निवडला गेला होता. परंतु, तो ‘बेस्ट इंटरनॅशनल फीचर’ श्रेणीच्या लॉंगलिस्टमध्ये समाविष्ट होऊ शकला नाही. त्याशिवाय रवि किशन नेटफ्लिक्सवरील ‘मामला लीगल है’ या मालिकेत दिसले होते.