आजच्या पिढीतील तरुणांसाठी ‘कबीर सिंग’सारखी टॉक्सिक आणि इंटेन्स लव्हस्टोरी आजतागयात झालेली नाही असं आपण कधीच म्हणू शकत नाही. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याने हा प्रयोग बऱ्याच वर्षांपूर्वी ‘तेरे नाम’सारख्या चित्रपटातून केला अन् त्याला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. ‘तेरे नाम’चं नाव जरी घेतलं तरी निर्जराच्या प्रेमात आकंठ बुडालेला, तिच्याशी लग्न करण्यासाठी वेडापिसा झालेला राधे हा आजही आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभा राहतो. पण तुम्हाला माहितीये का कि ‘तेरे नाम’च्या चित्रीकरणादरम्यान सलमान खान हा काहीसा असाच विक्षिप्त वागायचा.
खुद्द रवी किशन यांनीच या गोष्टीचा खुलासा केला आहे. रवी किशन यांनी ‘तेरे नाम’मध्ये एक छोटी पण महत्त्वाची भूमिका निभावली होती. ‘दी लल्लनटॉप’शी संवाद साधतांना चित्रीकरणादरम्यान रवी किशन यांना आलेला अनुभव आणि सेटवर सलमानचा स्वभाव याबद्दल भाष्य केलं आहे. कारण त्यावेळी सलमानच्या खासगी आयुष्यात बरीच उलथापालथ सुरू होती, अन् यामुळेच रवी किशन हे सलमानपासून चार हात लांबच राहायचे.
याविषयी खुलासा करताना रवी किशन म्हणाले, “तेरे नामच्या सेटवर मी जास्त त्यांच्यात लुडबूड करायचो नाही, कारण त्यांचं पात्र राधे हे फारच गुंतागुंतीचं आणि गडद होतं. दिग्दर्शक सतीश कौशिक सुद्धा यांची हीच इच्छा होती, बहुतेक सलमानसुद्धा त्याच्याच पात्रात हरवून गेला होता. सेटवर मी सलमानपासून एक ठराविक अंतर ठेवूनच वावरायचो.” चित्रीकरणानंतर रवी किशन हे सलमानला भेटायचे, अन् त्यानंतरच हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली. नंतर दोघे मिळून रात्रीचे जेवण एकत्रच करत असत. त्यावेळी रवी किशनविषयी सलमानला बरीच माहिती होती.
‘तेरे नाम’ २००३ मध्ये प्रदर्शित झाला अन् तेव्हा चांगलाच गाजला. प्रेक्षकांना सलमानचं पात्र आणि कथेचं सादरीकरण प्रचंड भावलं. या चित्रपटातून सलमान खानबरोबर अभिनेत्री भूमिका चावला हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. याबरोबरच तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही काम केलं आहे. रवी किशन यांनीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका निभावली होती. रवी किशन हे भोजपुरी चित्रपटसृष्टीचे एक मोठे स्टार आहेत. नुकतंच ते किरण राव यांच्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटात झळकले.