दिवगंत अभिनेते राज कुमार(Raaj Kumar) हे त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. तिरंगा, पाकिजा, वक्त हे चित्रपट उत्तम चित्रपटांपैकी एक आहेत. अनेक कलाकार त्यांना त्यांचे आदर्श मानतात. आता रझा मुराद यांनी राज कुमार यांच्यावर खुनाचा खटला दाखल केला होता, असा खुलासा नुकत्याच एका मुलाखतीत केला आहे. एका माणसाला राज कुमार यांनी इतकी मारहाण केली की, त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, असा खुलासा रझा मुराद यांनी केला आहे. तसेच नेमके ही घटना कधी घडली याबद्दल त्यांनी काही सांगितले नाही. मात्र, १९५७ साली प्रदर्शित झालेला मदर इंडिया हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी ही घटना घडल्याचा उल्लेख त्यांनी केला.
राज कुमार यांना प्रचंड राग…
रझा मुराद ही घटना सांगताना म्हणाले, “राज कुमार जुहू बीचवर त्यांचा मित्र आणि मित्राची गर्लफ्रेंड यांच्याबरोबर फिरत होते. त्यावेळी एका माणसानं त्या मुलीबद्दल टिप्पणी केली. ते ऐकताच राज कुमार यांना प्रचंड राग आला. त्यांनी त्या माणसाला मोठ्या प्रमाणात मारहाण केली. त्यानंतर त्या माणसाचा मृत्यू झाला. त्यानंतर राज कुमारवर खुनाचा खटला दाखल झाला होता.”
पुढे रझा यांनी सांगितले की, त्यांचे वडील राज कुमार यांचे मित्र असल्याने प्रत्येक न्यायालयीन सुनावणीला जात असत. काही महिने ही केस चालली. त्यानंतर राज कुमार यांची निर्दोष सुटका झाली. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी राज कुमार मुंबई पोलिस दलात पोलीस म्हणून काम करीत होते.
दिग्दर्शक मेहुल कुमार यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, राज कुमार यांनी नाना पाटेकर यांच्याबरोबर तिरंगा या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. कारण त्यांनी असे ऐकले होते की नाना पाटेकर सेटवर अपशब्द वापरतात. मेहुल कुमार म्हणाले होते, “जेव्हा राज कुमार यांना सांगितले की, चित्रपटात नाना पाटेकरांना कास्ट केले आहे. त्यावर राज कुमार म्हणाले होते की, नाना सेटवर शिवीगाळ करतो, लोकांना मारतो. तुम्ही त्याला चित्रपटात का घेतले?”, अशी आठवण मेहुल कुमार यांनी श्रेष्ठ भारत या यूट्यूबरवर बोलताना सांगितली होती. याबरोबरच, ‘फ्रायडे टॉकिज’बरोबर बोलताना मेहुल कुमार यांनी सांगितले होते की, रजनीकांत यांनी राजकुमार यांच्याबरोबर काम करण्यास नकार दिला होता. ज्याच्याबद्दल काहीच अंदाज लावला जाऊ शकत नाही, त्याच्याबरोबर रजनीकांत यांना काम करायचे नव्हते.
दरम्यान, राज कुमार यांनी १९५२ साली प्रदर्शित झालेल्या ‘रंगेली’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर अनेक उत्तम भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली होती. बॉलीवूडमध्ये राज कुमार यांचे महत्त्वाचे योगदान मानले जाते.