दिग्गज अभिनेते राजेश खन्ना(Rajesh Khanna) यांच्या चित्रपटांबाबत जितके बोलले जाते, तितकेच त्यांचे अनेक किस्से आजही सांगितले जातात. १९७२ साली हृषिकेश मुखर्जी यांच्या गाजलेल्या नमक हराम या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. या चित्रपटात त्या काळात लोकप्रिय असलेले राजेश खन्ना, नव्यानेच बॉलीवूडमध्ये आलेले अमिताभ बच्चन व रझा मुराद हे प्रमुख भूमिकेत होते. रझा मुराद व राजेश खन्ना या चित्रपटात जवळचे मित्र होते, त्यामुळे चित्रपटात राजेश खन्ना व ते एकमेकांना बंधू अशी हाक मारत असत. मात्र, प्रत्यक्षात जवळच्या मित्राची भूमिका रझा यांनी साकारल्याचा आनंद राजेश खन्ना यांना झाला नव्हता, कारण राजेश खन्ना यांना त्यांचा जवळचा मित्र विनोद शर्माला ही भूमिका मिळावी, असे वाटत होते. मात्र, हृषिकेश मुखर्जी यांनी त्यासाठी स्पष्टपणे नकार दिला होता. आता रझा मुराद यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत राजेश खन्ना यांच्याबरोबर काम करण्याचा पहिला अनुभव कसा होता, यावर वक्तव्य केले आहे.

त्या काळात राजेश खन्नांना नाराज करणे…

रझा मुराद यांनी नुकतीच एएनआयला मुलाखत दिली. या मुलाखतीत रझा मुराद म्हणाले, “चित्रपटातील आलम ही भूमिका राजेश खन्ना यांचे मित्र व गुरु विनोद शर्मा यांनी करावी, असे त्यांना वाटत होते. पण, हृषिकेश मुखर्जी यांनी याला नकार दिला. त्यामुळे काका (राजेश खन्ना) नाराज होते. त्या काळात राजेश खन्नांना नाराज करणे हे देवाला नाराज करण्यासारखे होते. त्यांच्या प्रसिद्धीमुळे त्यांना खूप सन्मान मिळत असे.”

पुढे रझा मुराद म्हणाले, “नील नितीन मुकेश यांचे वडील, नितीन मुकेश, हृषिकेश मुखर्जी यांचे असिस्टंट म्हणून काम करीत होते. त्यांनी मला काळजीने सांगितले की राजेश खन्ना तुझ्याशी वेगळे वागतील किंवा थंडपणे वागतील. ते ऐकल्यानंतर मला अस्वस्थ वाटत होते. मात्र, तरीही मला काम करावे लागणार होते.”

जेव्हा चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली, तेव्हा त्यांनी असे काही पाहिले, ज्याची त्यांनी कधीही कल्पना केली नव्हती. रझा मुराद म्हणाले, “सेटवर दोन हजारपेक्षा जास्त मुलींनी राजेश खन्ना यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती. राजेश खन्ना यांची जादू संपूर्ण देशावर होती. त्यांना पाहण्यासाठी गर्दी होत असे. ते सगळे आपोआप व्हायचे. त्यावेळी टेलिव्हिजन नव्हते, फोन नव्हते, पीआर नव्हते; तरीही लोकांना त्यांचा ठावठिकाणा कळायचा आणि त्यांना पाहण्यासाठी ते तिथे पोहोचायचे”, अशी आठवण रझा मुराद यांनी सांगितली.

रझा मुराद म्हणाले, “ज्यावेळी मी सेटवर हे दृश्य पाहिले, तेव्हा राजेश खन्ना यांना शूटिंगआधी भेटण्याचे ठरविले. मी नितीन मुकेश यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हणालो की, मला राजेश खन्ना यांची ओळख करून द्या. ते मला राजेश खन्ना यांच्याकडे घेऊन गेले आणि म्हणाले हा रझा मुराद. हा आलम ही भूमिका साकारणार आहे. हे ऐकल्यानंतर राजेश खन्ना यांनी लगेच माझ्याकडे पाहिले आणि ते उठून उभे राहिले. त्यांनी माझ्याशी हस्तांदोलन केले. त्यांचे ते वागणे मला मैत्रीपूर्ण वाटले. जेव्हा पहिला सीन शूट केला तेव्हा मी अस्वस्थ होतो, कारण राजेश खन्ना हे माझ्या कास्टिंगवर खूश नव्हते. मात्र, राजेश खन्ना यांनी माझे कौतुक केले, त्यामुळे आमच्यात असणारा तणाव कमी झाला आणि शूटिंग व्यवस्थित पार पडले.”