सध्या बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक घटना किंवा वीर-पुरुषांवर बेतलेल्या चित्रपटांचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. वेगवेगळे वादग्रस्त, संवेदनशील तसेच ज्वलंत विषय हे बऱ्याच नव्या दिग्दर्शकांकडून हाताळले जात आहेत. अशातच आता ‘हैदराबाद मुक्ती संग्राम’ यावर बेतलेल्या आगामी ‘रजाकार’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने हा ट्रेलर सादर केला असून सोशल मीडियावर याची जबरदस्त चर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२ मिनिटे ३९ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये संपूर्ण हैदराबाद मुक्ती संग्राम, त्यावेळी तिथल्या स्थानिक लोकांवर झालेले अत्याचार आणि नरसंहार, तेव्हाची राजकीय परिस्थिति, भारत सरकारने त्यात केलेला हस्तक्षेप आणि सरदार वल्लभभाई पटेल व तत्कालीन सरकारने हैदराबादसाठी घेतलेले काही कठोर निर्णय आणि एकूणच निजामाचं साम्राज्य टिकवू पाहणारी वृत्ती अशा बऱ्याच गोष्टींची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. हैदराबादचा सातवा निजाम मीर उस्मान अली खानच्या शासनादरम्यान हा भयंकर नरसंहार घडला.

आणखी वाचा : ‘फायटर’ चित्रपट पाहून मेजर जनरल जीडी बक्षी यांनी दिली प्रतिक्रिया; हृतिक रोशनला टॅग करत म्हणाले…

“या तो मजहब बदलना होगा, या फिर ये राज्य छोड़ना होगा”, “ओम शब्द सुनाई नहीं देना चाहिए और भगवा रंग दिखाई नहीं देना चाहिए”, “मै हैदराबाद को दूसरा काश्मीर बनने नहीं दुंगा.” असे काही दमदार संवादही ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत. याबरोबरच जबरदस्त हिंसाचार, रक्तपातही यामध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन याता सत्यनारायण यांनी केले आहे तर याची निर्मिती भाजपा सदस्य गुडूर नारायण रेड्डी यांनी केली आहे.

याआधी जेव्हा या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हा प्रचंड विरोध झाला होता, पण आता २०२४ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या चित्रपटात मुस्लिमांना नकारात्मक पद्धतीने दाखवलं गेलं असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या चित्रपटात महेश अचंता, अनसूया भारद्वाज, राज अरुण, मकरंद देशपांडे, अश्विनी काळसेकर यांच्यासारखे मुरलेले कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. हा चित्रपट १ मार्च २०२४ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Razakar movie trailer out based on hyderabad silent genocide avn