RHTDM : “मैं दिल्ली बोल रहा हू मॅडी से…” हा डायलॉग ऐकला तरी आपल्याला डोळ्यासमोर येतो आर माधवन अर्थात आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता मॅडी. बरोबर २३ वर्षांपूर्वी त्याने एका सुपरहिट चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्याच्यासह या चित्रपटात झळकलेली प्रमुख अभिनेत्री दिया मिर्झाचा सुद्धा हा पदार्पणाचा सिनेमा होता. आता प्रत्येकाला समजलं असेल आपण कोणत्या चित्रपटाबद्दल बोलतोय…या चित्रपटाचं नाव आहे ‘रहना है तेरे दिल मैं’.
‘रहना है तेरे दिल मैं’ या चित्रपटाला आजची तरुणाई RHTDM या शॉर्ट फॉर्मनुसार ओळखते. प्रत्येकाच्या मनात या चित्रपटासाठी एक वेगळं स्थान आहे. मॅडी बघता क्षणी रीना मल्होत्राच्या प्रेमात पडतो. पहिल्या नजरेतलं प्रेम म्हणजे नेमकं काय? त्यानंतर पावसात भिजणाऱ्या रीनाला पाहून मॅडीची बोबडी कशी वळते…हा सीन सध्या इन्स्टाग्रामवर देखील प्रचंड व्हायरल होत आहे. रीना आणि मॅडीच्या लव्हस्टोरीमध्ये राजीवची कशी एन्ट्री होते. मॅडी रीनापासून आपली ओळख का लपवतो यानंतर राजीव आणि मॅडीचं कॉलेजपासून असणारं वैर या सगळ्या वर्तुळात ‘रहना है तेरे दिल मैं’ हा चित्रपट फिरतो.
हेही वाचा : Bigg Boss Marathi : घरात तोडफोड केल्यावर ‘बिग बॉस’ने अरबाजला दिली मोठी शिक्षा! निक्कीची ‘ती’ कृती ठरली कारणीभूत
‘रहना है तेरे दिल मैं’ ( RHTDM ) चित्रपटाची कथा सर्वांनाच आवडते. याशिवाय हा चित्रपट सर्वाधिक चर्चेत येण्याचं कारण म्हणजे यामधली गाणी. “जरा जरा…”, “दिलको तुमसे प्यार हुआ”, “सच कह रहा है दीवाना…” अशी सदाबहार गाणी प्रेक्षकांच्या आजही ओठावर आहेत. इन्स्टाग्राम रील्स असो किंवा युट्यूबवरचे शॉट्स व्हिडीओ सर्वत्र या चित्रपटातील गाण्यांचा बोलबाला पाहायला मिळतो. असा हा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सिनेमागृहांमध्ये पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे.
२३ वर्षांनी ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
दिया मिर्झा, आर माधवन आणि सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘रहना है तेरे दिल मैं’ हा चित्रपट २३ वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्यांनी केलेल्या घोषणेनुसार हा चित्रपट येत्या शुक्रवारी म्हणजेच ३० ऑगस्टला पुन्हा एकदा प्रदर्शित केला जाणार आहे.
‘रहना है तेरे दिल मैं’ ( RHTDM ) पुन्हा प्रदर्शित होणार असल्याचं समजताच चित्रपटाच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला आहे. कमेंट्समध्ये युजर्सनी निर्मात्यांचे आभार देखील मानले आहेत. आता हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाल्यावर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd