अभिनय, सौंदर्य, नृत्य, नजाकत याच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीत आपली छाप उमटवणाऱ्या म्हणजे अभिनेत्री रेखा. मीनाकुमारी, वैजयंती माला, वहिदा रेहमान, आशा पारेख, शर्मिला टागोर, सायरा बानू, मुमताज यांचा वारसा त्यांनी दोन पावलं पुढे नेला. हेमा मालिनी, लीना चंदावरकर, साधना अशा लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचं शिवधनुष्य रेखा यांनी लीलया पेललं. अत्यंत वेग-वेगळ्या वळणा-वळणांचा प्रवास, आव्हानांचा डोंगर अन् अपेक्षाभंगाची खोल दरी पार रेखा यांनी केली. बिनधास्त, बेधडक, रोखठोक असा त्यांचा स्वभाव. रेखा या नावातच एक वेगळी ताकद आहे. हिंदी सिनेसृष्टीतील हे रेखा पर्व विसरता येणं केवळ अशक्य आहे. आज रेखा यांचा वाढदिवस. त्याचनिमित्ताने रेखा यांचा पहिला वहिला चित्रपट आणि पहिलं प्रेम प्रकरण याचे रंजक किस्से जाणून घेऊ या. दिलीप ठाकूर लिखित ‘रेखा म्हणजे तारुण्य’ या पुस्तकात प्रसंगाबद्दलचं सविस्तर वर्णन आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Soha Ali Khan Birthday: वडिलांच्या भीतीमुळे बँकेत नोकरी ते बॉलीवूडमध्ये पदार्पण, असा आहे सोहा अली खानचा प्रवास

१० ऑक्टोबर १९५४ साली तमिळनाडूत रेखा यांचा जन्म झाला. त्यांचं खरं नाव भानुरेखा गणेशन. वडील शिवाजी गणेशन. रेखा यांच्या वडिलांनी चार लग्नं केली. त्यातल्या पुष्पावली या रेखा यांच्या आई. बालपणापासूनच रेखा यांनी दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. ‘सावन भादो’ हा त्यांचा पहिला चित्रपट असं सहजरित्या म्हटलं जातं. पण त्या मोठ्या पडद्यावर एका वेगळ्याच चित्रपटातून पहिल्यांदा झकळल्या होत्या. त्यावेळेस त्या अवघ्या पाच वर्षांच्या होत्या. वडिलांबरोबर त्या चेन्नईतील एका स्टुडिओत सहज गंमत म्हणून शूटिंग पाहायला गेल्या होत्या. तेव्हा बी. नागीरेड्डी यांचा दिलीप कुमारची दुहेरी भूमिका असलेल्या ‘राम और श्याम’चं चित्रीकरण सुरू होतं. यावेळी दिलीप कुमार यांच्या बहिणीच्या वाढदिवसानिमित्तानाचे ‘आयी है बहारो की…’ हे गाणं चित्रीत होतं होत. त्यामुळे सेटवर बरीच मुलं होती. पण बी. नागीरेड्डींनी तेव्हा चिमुकल्या रेखा यांना देखील त्या गर्दीत उभं केलं होतं. त्यामुळे रेखा यांचा ‘राम और श्याम’ हा पहिला चित्रपट असल्याचं म्हटलं जात. त्यानंतर रेखा यांनी बऱ्याच दाक्षिणात्य चित्रपटात केलं. पण काही वर्षांनंतर कौटुंबिक कलहांमुळे रेखा यांनी तमिळनाडू सोडलं आणि त्या आपल्या आईबरोबर मुंबईला आल्या. त्यानंतर हिंदी सिनेसृष्टीत रेखा या पर्वाला सुरुवात झाली.

हेही वाचा – अपघातामुळे वजन गेलं शंभरीपार.. अलका कुबल यांनी कशी केली त्यावर मात? वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल

‘सावन भादो’ या चित्रपटाद्वारे रेखा यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. १९६८ मध्ये निर्माता-दिग्दर्शक मोहन सैगल यांनी ‘सावन भादो’ या चित्रपटात नवीन कलाकारांना संधी देण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे संधीच्या शोधात असणाऱ्या रेखा यांना त्या चित्रपटासाठी निवडलं. तेव्हा रेखा या अवघ्या १६ वर्षांच्या होत्या. रेखा यांचं सावळं रुप असल्यामुळे मोहन सैगल यांना त्या फारशा पसंतीस पडल्या नव्हत्या. त्यात दक्षिणेतील जन्म असल्यामुळे रेखा यांचं हिंदी भाषेवर तितकंस प्रभुत्व नव्हतं. सदोष उच्चार होते. त्यामुळे मोहन सैगल यांच्या पुढे रेखा यांना चित्रपटात घ्यायचं की नाही? असे बरेच प्रश्न होते. पण त्यांनी अखेर ग्रामीण भागातली मुलगी दाखवण्यासाठी रेखा यांनाच निवडलं. रेखा यांचा हा हिंदी सिनेसृष्टीतील पहिला वहिला चित्रपट सुपरहिट ठरला. रेखा यांनी ग्रामीण भागातल्या या मुलीच्या भूमिकेत जान ओतली. त्यानंतर त्यांनी बऱ्याच चित्रपटात काम केलं. सिनेसृष्टीत लोकप्रिय होताच एकेदिवशी रेखा यांनी शिळा उपमा खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बातमी सर्वत्र पसरली. रेखा यांनी असं का बरं केलं असावं? आता कुठे करिअरला सुरुवात झाली होती, मग असं टोकाचं पाऊल का बरं उचललं असावं? रेखा यांच्या आयुष्यात नेमकं काय घडलं, ज्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला? अशा प्रश्नांचा भडीमार सुरू झाला. रेखा यांच्या चाहत्यांसह सगळे जण हादरले होते. पण घटनेच्या दुसऱ्याच दिवशी रेखा यांनी पत्रकार परिषद घेऊन आत्महत्येचा प्रयत्न का केला? यामागच्या कारणाचा खुलासा केला.

हेही वाचा – ‘दादा कोंडके, कृष्णाष्टमी आणि जीवनमरणाच्या हिंदोळ्यावर’

रेखा त्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या,”विनोद मेहरांवरील प्रेम व्यक्त करण्याचा हा एक प्रयत्न होता. ते माझ्या प्रेमाला म्हणावी तशी दाद देत नव्हते म्हणून शिळा उपमा खाल्ला.” रेखा यांनी विनोद मेहरांवरील प्रेम जाहीरपणे व्यक्त केल्यामुळे गॉसिप मॅगझिन्सपासून ते चित्रपट पुरवण्यापर्यंत सर्वांना गरम मसाला मिळाला होता. सगळीकडे दहा तोंडाने बोलू जाऊ लागलं. रेखा यांना आपलं करिअर पुढे सरकवण्याची शिडी विनोद मेहरांच्या रुपाने मिळाली, असं म्हटलं जाऊ लागलं. तर दुसऱ्याबाजूला हा प्रेमाचा त्रिकोण असल्याची चर्चा सुरू झाली. रेखा व योगिता बाली या सख्ख्या मैत्रिणी होत्या. पण विनोद मेहरा योगिता बाली यांचे होऊ नये म्हणून रेखा यांनी आत्महत्येचं नाटक केल्याचं म्हटलं जाऊ लागलं. या आत्महत्येच्या प्रकरणामुळे रेखा अधिकच प्रसिद्धीच्या झोतात आल्या. काही काळानंतर रेखा यांनी विनोद मेहरा यांच्याबरोबर लग्न केलं. पण हे लग्न जास्त काळ टिकल नाही. मात्र विभक्त झाल्यानंतरही रेखा यांनी विनोद मेहरांबरोबर अनेक चित्रपट केले. दोघांनी एकत्र काम करण्यास फारसे आढेवेढे घेतले नाहीत. पण विनोद मेहरा यांच्यानंतर रेखा यांची बरीच प्रेमप्रकरणं झाली. जी आजही चर्चेत असतात.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rekha birthday special her first movie and first affair pps
Show comments