Rekha : दिवंगत गायिका लता मंगेशकर यांनी गायलेली गाणी आजही कानाला मंत्रमुग्ध करतात. त्यांच्या गाण्याचे आजही लाखो चाहते आहेत. लता मंगेशकरांनी त्यांच्या आवाजाने प्रत्येकाच्या मनात घर केलं आहे. आज त्या आपल्यामध्ये नसल्या तरी त्यांच्या अमृत स्वरांनी त्या अजरामर झाल्या आहेत. लता मंगेशकरांचा स्वभाव, त्यांनी गायलेली गाणी या सर्वांमुळे आपल्या घरीसुद्धा अशा एका मुलीने जन्म घ्यावा असे अनेकांना वाटते. अशात आता बॉलीवूडच्या एका दिग्गज अभिनेत्रीचीसुद्धा अशी इच्छा असल्याचं समजलं आहे.
आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री रेखा यांनी अशी इच्छा व्यक्त केली आहे. रेखा यांनी नुकतीच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये हजेरी लावली. शोमध्ये रेखा यांनी अनेक विषयांवर भावना व्यक्त केल्या, भरपूर गप्पा मारल्या आणि सर्वांना हसवलं. त्यात त्यांनी लता मंगेशकरांबरोबरचा एक किस्सासुद्धा सांगितला आहे.
हेही वाचा : स्पृहा जोशी होणार मावशी, बहिणीच्या डोहाळे जेवणाचे फोटो केले शेअर, माफी मागत म्हणाली…
रेखा म्हणाल्या की, “एकदा लता मंगेशकर यांनी मला त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला बोलावलं होतं, त्यावेळी मी तेथे पोहचल्यावर स्टेजवर गेले व हातात माईक घेऊन मी म्हणाले, लता दीदी, मी तुमची फार मोठी चाहती आहे. देवा तू मला ऐकत असशील तर कृपया, पुढल्या जन्मी मला लता दीदी यांच्यासारखी मुलगी दे. त्यानंतर लता दीदींनी उत्तर दिलं आणि म्हणाल्या, पुढल्या जन्मी का? मी या जन्मातसुद्धा तुमची मुलगी आहे. असं सांगून त्या आई… आई… अशी हाक मारत माझ्या जवळ आल्या. त्यांची ही हाक आजही माझ्या कानात ऐकू येते,” असं रेखा यांनी सांगितलं.
लता मंगेशकर यांनी गायलेल्या गाण्यांनी बॉलीवूडमधील अनेक चित्रपट सुपरहिट झाले आहेत. त्यातील अनेक गाण्यांवर रेखा यांनी सुंदर अभिनय केला आहे. ‘सिलसिला’ या चित्रपटातील लता मंगेशकरांनी गायलेलं “देखा एक ख्वाब” हे गाणं खूप गाजलं. या गाण्यात रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या अभिनयासह लता मंगेशकर यांचा मधुर आवाज असल्याने त्याकाळी या गाण्याला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं होतं.
हेही वाचा : बॉलीवूडमध्ये काम नव्हतं, आईसमोर प्रचंड रडलो अन्…; विवेक ओबेरॉयचं संपूर्ण आयुष्य ‘त्या’ दिवसापासून बदललं, तो क्षण कोणता?
लता मंगेशकर यांनी गायलेल्या ‘नीला आसमान सो गया’, ‘सलामे इश्क मेरी जान’, ‘आजकल पांव जमीन पर नहीं पड़ते’, ‘तेरे बिना जिया जाए ना’ या आणि अशा अनेक गाण्यांवर त्याकाळी रेखा यांनी सुंदर अभिनय आणि नृत्य सादर केलं आहे.