अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी अनेक चित्रपटांत विविध भूमिका साकारत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजही ते ज्या उत्साहाने काम करतात, त्यामुळे ते अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्याबरोबर काम करणे हे अनेक कलाकारांचे स्वप्न असते. चित्रपट, व्यावसायिक आयुष्याबरोबरच अमिताभ बच्चन हे त्यांच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतात. अभिनेत्री रेखा व त्यांच्या नावाचीदेखील अनेकदा चर्चा होताना दिसते. आता एका कार्यक्रमात अभिनेत्री रेखा यांनी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर १९७९ साली प्रदर्शित झालेल्या ‘सुहाग’मध्ये काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.
काय म्हणाल्या अभिनेत्री?
अभिनेत्री रेखा यांनी ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये नुकतीच हजेरी लावली होती. यावेळी एका चाहत्याने ‘सुहाग’ चित्रपटातील एका डान्सविषयी प्रश्न विचारला. ‘सुहाग’ चित्रपटात तुम्ही दांडिया खूप छान खेळला आहात. तुम्ही गुजराती नसूनदेखील दांडिया इतक्या छान खेळलात की वाटलेच नाही तुम्ही गुजराती नाहीत, हे तुम्ही कसे केले? चाहत्याच्या या प्रश्नावर उत्तर देताना रेखा यांनी थेट अमिताभ बच्चन यांचे नाव न घेता म्हटले, “ज्यांच्याबरोबर मी दांडिया खेळत होते ती व्यक्ती कोण आहे याचा विचार करा, चांगले खेळणार नाही तर काय करणार? दांडिया येत असतील किंवा नसतील, समोर अशी व्यक्ती आल्यानंतर मी आपोआपच डान्स करायला लागायचे.”
रेखा व अमिताभ बच्चन यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांत काम केले आहे. ‘दो अनजाने’ (१९७६), ‘मुकद्दर का सिकंदर’ (१९७८), ‘मिस्टर नटवरलाल’ (१९७९) आणि ‘आलाप’ (१९७७) अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांत त्यांनी एकत्र काम केले आहे. अमिताभ बच्चन आजही विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात. काही दिवसांपूर्वी ते ‘कल्की: २८९८ एडी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्यांची भूमिका प्रेक्षकांना आवडल्याचे पाहायला मिळाले होते. सध्या अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय टीव्ही शोचे सूत्रसंचालन करताना दिसत आहेत.
दरम्यान, अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये प्रेक्षकांबरोबर त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से सांगताना दिसतात. त्यांच्या अंदाजात ते प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. अमिताभ बच्चन गेल्या काही दिवासांपासून अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन यांच्या घटस्फोटांच्या चर्चांमुळेदेखील चर्चेत आहेत.