चेहऱ्यावरच्या सुंदर हास्यामुळे माणसाचं सौंदर्य आणखी खुलतं असं म्हटलं जातं. ९० च्या दशकात ज्यांनी एका हास्यावर संपूर्ण बॉलीवूडला भुरळ घातली अशा मराठमोळ्या अभिनेत्री म्हणजेच रेणुका शहाणे. त्यांचा सहजसुंदर अभिनय अन् मनमोहक हास्याचे आजही लाखो चाहते आहेत. रेणुका शहाणे यांचा आज ५७ वाढदिवस. मुंबईच्या मिठीबाई महाविद्यालयात कला शाखेत त्यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं. परंतु, मराठमोळी रेणुका खऱ्या अर्थाने ‘सुरभि’मुळे नावारुपाला आली. रेणुकांची ‘सुरभि’शी गाठ नेमकी कशी बांधली गेली पाहूयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेराव, वनिता खरात आणि ओंकार भोजने पुन्हा एकत्र, ‘त्या’ फोटोने वेधलं लक्ष

टेलिव्हिजनवरील काही कार्यक्रम लोकप्रिय ठरतात, काही सुरू होताच बंद होतात अन् काही अजरामर ठरतात. आज ३० वर्षांनी सुद्धा ज्या कार्यक्रमाविषयी घरोघरी चर्चा केली जाते तो म्हणजे ‘सुरभि’. भारतीय संस्कृती आणि देशातील विविध राज्यांविषयी माहिती देणारा हा परिपूर्ण कार्यक्रम १९९० मध्ये सुरु झाला. ‘सुरभि’ने १९९० ते २००१ ही जवळपास १० वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. दर रविवारी रात्री ९.३० च्या ठोक्याला प्रसारित होणाऱ्या ‘सुरभि’ची लोक आतुरतेने वाट पाहायचे. सिद्धार्थ काक आणि रेणुका शहाणे हे दोघंजण या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायचे. सिद्धार्थ काक सुरभिचे निर्माते होते पण, रेणुकांचं हास्य या कार्यक्रमाचं सर्वात मोठं आकर्षण होतं.

सिद्धार्थ काक यांच्या पत्नीने सुरभिसाठी अनेक ऑडिशन्स घेतल्या होत्या. खरंतर रेणुका शहाणे ऑडिशनच्यावेळी त्यांची संपूर्ण स्क्रिप्ट विसरल्या होत्या परंतु, चेहऱ्यावरचं हास्य कायम ठेवत त्यांनी न घाबरता ऑडिशन दिली. सिद्धार्थ काक यांच्या पत्नी गीता यांना रेणुकांचा आत्मविश्वास आवडला आणि त्यांची सुरभिसाठी निवड झाली. १९९३ मध्ये या कार्यक्रमाची लोकप्रियता एवढी वाढली की, रेणुका आणि सिद्धार्थ यांना एका आठवड्यात तब्बल १४ लाख पत्र मिळाली होती. याच काळात शोच्या लोकप्रियतेमुळे भारतीय पोस्टाने कन्टेंट पोस्टकार्ड हा नवा प्रकार सुरू केला होता.

हेही वाचा : “मी चाललो माझ्या खऱ्या आईला भेटायला…,” चैत्याचा निरागस अंदाज अन् भारावून टाकणारी दृश्य, ‘नाळ २’चा टीझर प्रदर्शित

एकीकडे सुरभिची लोकप्रियता वाढत असताना दुसरीकडे रेणुका शहाणेंसाठी बॉलीवूडची संधी ‘हम आपके है कौन’च्या रूपात चालून आली आणि १९९४ मध्ये दोन मराठमोळ्या अभिनेत्रींनी बॉलीवूड गाजवलं. या चित्रपटाच्या सेटवरचा किस्सा रेणुका शहाणे यांनी ‘कौन बनेगा करोडपती’च्या (मराठी) मंचावर सांगितला होता. त्या म्हणतात, “माधुरी मला कायम सेटवर स्वत:च्या बाजूला बसवायची. लोकांबरोबर ओळख करून द्यायची. सेटवर ती मला शहाणी म्हणून हाक मारायची. तिचं कायम ‘शहाणी इकडे ये…शहाणी’ असं सुरु असायचं. तिच्यामुळे मला ‘हम आपके है कौन’ सेटवर फार छान वाटायचं आणि माधुरीने माझी प्रचंड काळजी घेतली होती.”

वयाच्या २० व्या वर्षी किंग खानबरोबर केलं काम

रेणुका शहाणे यांनी १९८९ मध्ये ‘सर्कस’ मालिकेत सुपरस्टार शाहरुख खानबरोबर काम केलं होतं. रेणुका शाहरुखच्या आधीपासूनच चाहत्या होत्या त्यामुळे आवडत्या अभिनेत्याबरोबर काम करायला मिळणं ही त्यांच्यासाठी पर्वणीचं ठरली. सर्कस मालिकेचं शूटिंग लाइव्ह करण्यात यायचं. तेव्हा रेणुका या शाहरुख खानच्या पहिल्या हिरोईन होत्या. त्यांनी या मालिकेत ‘मारीया’ हे पात्र साकारलं होतं.

९० च्या दशकात टीव्हीवर आणखी एका कार्यक्रमाचा दबदबा निर्माण झालेला तो म्हणजे ‘अंताक्षरी’. १९९३ मध्ये सुरु झालेल्या या कार्यक्रमाने प्रत्येक कुटुंबाला एकत्र आणलं. प्रत्येक रविवारी अंताक्षरी बघण्याची उत्सुकता कुटुंबातल्या प्रत्येकाला असायची. या म्युझिकल शोचं सूत्रसंचालन अन्नु कपूर यांनी करायचे. त्यांना सहसूत्रसंचालक म्हणून रेणुका शहाणेंची उत्तम साथ मिळाली. छोट्या पडद्यावर दोघांचीही जोडी सुपरहिट ठरली होती.

‘सर्कस’, ‘सुरभि’, ‘हम आपके है कौन’ यामुळे रेणुका घराघरांत लोकप्रिय झाल्या. १९९८ हे वर्ष अभिनेत्रीसाठी सर्वार्थाने खास ठरलं कारण, अभिनेत्रीच्या आयुष्यात नकळतपणे खऱ्या अभिनेत्याची एन्ट्री झाली. राजेश्वरी सचदेव यांनी एका चित्रपटाच्या सेटवर रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा यांची ओळख करून दिली. पहिल्या भेटीत त्यांचं फारसं बोलणं झालं नाही. मात्र, १७ ऑक्टोबर १९९८ मध्ये आशुतोष राणा यांनी रेणुकाला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला. तेव्हापासून दोघांमध्ये वरचेवर बोलणं सुरू झालं. ३१ डिसेंबर १९९८ मध्ये दोघांची भेट झाली आणि त्यांचं नातं बहरू लागलं.

आशुतोष राणा त्यांच्या गुरूंना (दादाजी) प्रचंड मानतात. राणांच्या दादाजींनी ‘हीच मुलगी तुझ्यासाठी योग्य आहे’ असं सांगितलं होतं. त्यामुळे आशुतोष राणा यांनी रेणुकांना लग्नाची मागणी घातली. पहिलं लग्न अपयशी ठरल्याने खूप विचार करून अभिनेत्रीने या लग्नासाठी होकार कळवला होता.

आशुतोष राणा यांचं कुटुंब मध्यप्रदेशातील छोट्या गावातील होतं. त्यामुळे रेणुका शहाणे यांच्या आई शांता गोखले यांना मुलीच्या लग्नाचं सुरूवातीला फारचं दडपण आलं होतं. अभिनेत्रीला परंपरा, संस्कृतीमध्ये वेगळेपणा जाणवेल याबद्दल त्यांच्या आईला खात्री होती. पण, रेणुका यांनी पुन्हा एकदा हसऱ्या चेहऱ्याने सगळी जबाबदारी स्वीकारली आणि २००१ मध्ये आशुतोष राणांसह लग्नगाठ बांधली.

हेही वाचा : Tiger 3 Trailer Update: काऊंटडाउन सुरू; ‘या’ दिवशी येणार सलमान खानच्या बहुचर्चित ‘टायगर ३’चा ट्रेलर

रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा यांच्या सुखी संसाराला आता २२ वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यांना शौर्यमन आणि सत्येंद्र अशी दोन मुलं आहेत. लग्नानंतर रेणुका यांनी बॉलीवूडमधून ब्रेक घेतला. पुढे २००८ मध्ये त्यांनी दिग्दर्शनात पाऊल ठेवलं. मुलं मोठी झाल्यावर हळुहळू त्यांनी पुन्हा काम करण्यास सुरूवात केली. अभिनयाशिवाय त्या अनेकदा सामाजिक विषयांवर आपलं मत मांडत असतात. याची प्रचिती प्रेक्षकांना ‘त्रिभंग’मुळे आली.

२०२१ मध्ये त्यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या त्रिभंग चित्रपटाचं प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून कौतुक करण्यात आलं. या चित्रपटाचं कथानक महिला सक्षमीकरणावर आधारित होतं. त्यानंतर २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटातून त्या विकी कौशलच्या ऑनस्क्रीन आईच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. इंडस्ट्रीत बड्या अभिनेत्यांबरोबर काम करूनही त्यांनी स्वत:मधील साधेपणा, चेहऱ्यावरचं गोड हास्य आजही जपून ठेवलंय. अशा या प्रेक्षकांच्या लाडक्या ‘सुरभि’ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Renuka shahane birthday article famous television actress in 90s and first heroine of shahrukh khan sva 00