Renuka Shahane on Shah Rukh Khan: रेणुका शहाणे लवकरच ‘देवमाणूस’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा मराठी सिनेमा असून यामध्ये त्यांच्याबरोबर महेश मांजरेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सगळ्यात त्यांनी नुकतेच एका मुलाखतीत शाहरूख खानबाबत केलेले वक्तव्य मोठ्या चर्चेत आहे.
रेणुका शहाणे यांनी नुकतीच रेडिओ नशाला मुलाखत दिली. या मुलाखतीत रेणुका शहाणे यांनी शाहरुख खानची पहिली नायिका म्हणून काम कऱण्याचा अनुभव कसा होता, याबाबत वक्तव्य केले. रेणुका शहाणे आणि शाहरुख खान यांनी ‘सर्कस’ या टीव्ही मालिकेत काम केले आहे. या मालिकेत रेणुका शहाणे या शहारुख खानच्या नायिका होत्या.
स्पॉटबॉयपासून ते निर्मात्यापर्यंत…
अभिनेत्री म्हणाल्या, “त्याने आधीच ‘फौजी’ ही मालिका केली होती, त्याचा मोठा चाहता वर्ग तयार झाला होता. त्याचे शूटिंग बघण्यासाठी हजारो लोक गर्दी करत असत. मी त्याला ३६-३६ तास काम करताना पाहिलं आहे. तो त्याच्या कामाप्रति समर्पित आहे. याबरोबरच तो सर्वांशी नम्रतेने वागत असे. स्पॉटबॉयपासून ते निर्मात्यापर्यंत तो सर्वांना समान वागणूक देत असे, सर्वांशी आदराने वागत असे. तो महिलांबरोबर ज्या पद्धतीने वागतो, त्यावरून कळते की तो जेंटलमन आहे. लोकांबरोबर स्वत:ला जोडण्यासाठी तो मेहनत घेतो. इतरांच्या कामाचे कौतुक करतो”, असे म्हणत रेणुका शहाणे यांनी शाहरूख खानबरोबर त्याची पहिली नायिका म्हणून काम करताना काय अनुभव आला, यावर वक्तव्य केले आहे.
शाहरूख खानने बॉलीवूडमध्ये १९९२ मध्ये ‘दीवाना’ या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर ‘बाजीगर’, ‘कल हो ना हो’, ‘ओम शांती ओम’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘करण अर्जुन’, ‘डर’, ‘कभी हाँ कभी ना’, ‘आर्मी’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘देवदास’, ‘कुछ कुछ होता है’ अशा अनेक चित्रपटांतून त्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्याच्या अभिनयाच्या हटके स्टाईलमुळे त्याला मोठी लोकप्रियता मिळाली. अभिनेत्याचे अगदी कमी चित्रपट फ्लॉप ठरले.
२०२३ मध्ये जेव्हा बॉलीवूडचे इतर चित्रपट फ्लॉप ठरत होते, तेव्हा शाहरुख खानचे ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ हे चित्रपट सलग प्रदर्शित झाले आणि तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. विशेष बाब म्हणजे, फक्त रेणुका शहाणे यांनी शाहरुख खानबरोबर काम केले असे नाही, तर त्यांचे पती लोकप्रिय अभिनेते आशुतोष राणा यांनीदेखील किंग खानबरोबर ‘पठाण’ चित्रपटात स्क्रीन शेअर केली आहे.
त्यादरम्यान, अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी आशुतोष राणा यांच्याबरोबरचा एक फोटो एक्स अकाउंटवर शेअर केला होता. ‘पठाण’ चित्रपट पाहण्यासाठी गेलो होतो, अशी कॅप्शन लिहिली होती. त्यावर शाहरुख खानने कमेंट करीत लिहिले होते की, तुम्ही कर्नल लुथराजींना सांगितलं का की तुम्ही माझी पहिली नायिका आहात? किंवा आपण हे गुपित ठेऊयात, नाहीतर ते मला एजन्सीमधून काढून टाकतील; अशी मजेशीर कमेंट किंग खानने केल्याचे पाहायला मिळाले.
शाहरुख खान लवकरच ‘किंग’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याची लेक सुहाना खान व अभिषेक बच्चनदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.