मॉडेल, अभिनेत्री पूनम पांडेचं निधन झालं आहे. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून तिच्या निधनासंदर्भात पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ‘सर्व्हीकल कॅन्सर’ म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने तिचं निधन झालं होतं, असं तिच्या अकाउंटवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. कर्करोगाच्या शेवटच्या टप्प्यात असताना निदान झालं, असं तिच्या मॅनेजरने सांगितलं होतं. पण यात एक ट्विस्ट आला आहे.
तीन दिवसांपूर्वी तिनेच इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पूनम पांडे अगदी ठणठणीत दिसत होती, त्यामुळे चाहते व इंडस्ट्रीतील लोकांना तिच्या निधनाच्या बातमीवर विश्वास बसत नव्हता. पूनमचं निधन कानपूरमध्ये झाल्याचं तिच्या मॅनेजरने सांगितलं आहे. अशातच ‘झूम टीव्ही’ ने एका सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, तिचं निधन कर्करोगाने नाही तर ड्रग्ज ओव्हर डोसमुळे झालं आहे. पण या माहितीची पुष्टी करण्यात आलेली नाही. ‘झूम टीव्ही’ ने केलेल्या दाव्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे.
बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडेचं निधन; अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरील पोस्ट व्हायरल
दरम्यान, तिच्या निधनाचं नेमकं कारण अद्याप कुटुंबियांनी स्पष्ट केलेलं नाही. तिच्या कुटुंबियांनीदेखील यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. सोशल मीडियावर तिचे चाहते आणि इतर सेलिब्रिटी पोस्ट करून तिच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहेत. तिच्या निधनाच्या बातमीने धक्का बसला आहे, असं हेली शाह, मुनव्वर फारुकी, अंजली अरोरा, राहुल वैद्य यांनी म्हटलं आहे.
पूनम पांडेने २०१३ मध्ये ‘नशा’ या बॉलीवूड चित्रपटातून पदार्पण केलं होतं. तर, ती काही रिअॅलिटी शोमध्येही झळकली होती. कंगना रणौतच्या ‘लॉक अप’ मध्ये पूनम पांडे दिसली होती.