बॉलीवूडच्या लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे रिचा चड्ढा आणि अली फैजल. बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०२०मध्ये रिचा आणि अलीने नोंदणी पद्धतीने लग्न केलं. त्यानंतर दोन वर्षांनी २०२२मध्ये दोघांनी कुटुंब आणि मित्र मंडळींसह लग्नाचं सेलिब्रेशन केलं. गेल्या वर्षी रिचा आणि अली पहिल्यांदाच आई-बाबा झाले. रिचाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. दोघांनी ही आनंदाची बातमी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअर केली होती. पण, रिचा-अली आपल्या चिमुकल्या लेकीशी कसा संवाद साधतात आणि तिच्यासाठी नेहमी कोणतं गाणं गात असतात हे तुम्हाला माहितीये का? तर जाणून घ्या…
अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अली फैजल या दोघांनी मिळून प्रोडेक्शन हाउस सुरू केलं आहे. याच प्रोडक्शन हाउसचा पहिला चित्रपट ‘गर्ल्स विल बी गर्ल्स’ची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. हा चित्रपट ‘प्राइम व्हिडीओ’वर प्रदर्शित झाला आहे. याच चित्रपटानिमित्ताने रिचा आणि अली माध्यमांशी संवाद साधताना दिसत आहेत. नुकतंच दोघांनी ‘इंडियन एक्सप्रेस’शी बातचित केली. यावेळी त्यांनी चिमुकल्या लेकीबद्दल सांगितलं.
‘इंडियन एक्सप्रेस’च्या मुलाखतीमध्ये रिचा आणि अलीला विचारलं की, तुम्ही मुलीबरोबर कुठल्या भाषेत संवाद साधता? आणि तिच्यासाठी कोणतं गीत गाता? तेव्हा रिचा चड्ढा म्हणाली, “आम्ही सध्या तिच्याशी काहीही बोलत असतो. कारण आता आमची मुलगी ‘गुगु गागा’ करत आहे. तसंच ‘कौन है वो चॉकलेट का डॉगी?’ हे निरर्थक गाणं आम्ही तिच्यासाठी गात असतो. तेव्हा तिला खूप आनंद होतं असतो.”
दरम्यान, १६ जुलैला रिचा चड्ढा आणि अली फैजल यांच्या घरी लेकीचं आगमन झालं. दोघांनी आपल्या मुलीचं नाव ‘जुनैरा इदा फैजल’ असं ठेवलं आहे. ‘जुनैरा’ हा एक अरेबी शब्द आहे; ज्याचा अर्थ ‘गाइडिंन लाइट’ असा होतो. तर इंग्रजीत ‘फ्लावर ऑफ पॅराडाइज’ असा होतो. रिचा आणि अली दोघं लेकीला लाडाने ‘जूनी’ अशी हाक मारतात.