आज छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती साजरी केली जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. रायगडावर आज त्यांना अभिवादन करण्यासाठी अनेकांनी हजेरी लावली आहे. आता या निमित्ताने लोकप्रिय दिग्दर्शक संदीप सिंग यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या चित्रपटाच्या पोस्टरचा पहिला लूक शेअर केला आहे.
‘छत्रपती शिवाजी महाराज’ चित्रपटाचे नवीन पोस्टर चर्चेत
संदीप सिंग यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज भवानी मातेसमोर उभे असल्याचे दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात तलवार दिसत आहे. संदीप सिंग यांनी हे पोस्टर शेअर करताना लिहिले की जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. भारताचा अभिमान आणि महान योद्धे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त, संपूर्ण आशिया खंडाचे नशीब बदलवणाऱ्या महान राजाच्या शक्ती आणि भक्तीचे दर्शन घडवणारा फर्स्ट लूक आम्ही अभिमानाने सादर करत आहोत. शिवाजी महाराज यांचे शौर्य, सन्मान आणि स्वराज्याची त्यांची असाधारण गाथा प्रत्यक्षात आणणे हा सर्वोच्च सन्मान आहे, असे म्हणत हा चित्रपट २१ जानेवारी २०२७ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावर चाहत्यांनी कमेंट करत या चित्रपटाची वाट पाहत असल्याचे म्हटले आहे. तसेच हे पोस्टर चाहत्यांना आवडले असल्याचे कमेंट्समध्ये दिसत आहे.



या चित्रपटातील कास्टबद्दल बोलायचे तर ‘कांतारा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता ऋषभ शेट्टी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. याआधी ऋषभ शेट्टीने त्याच्या सोशल मीडियावर चित्रपटातील त्याचा लूक शेअर करीत चाहत्यांना माहिती दिली होती. सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर करीत अभिनेत्याने लिहिले होते की, भारतातील महान योद्धा व महान राजाची गाथा प्रस्तुत करत आहोत. ‘दी प्राइड ऑफ भारत – छत्रपती शिवाजी महाराज’ हा केवळ एक चित्रपट नाही, हा एका योद्ध्याच्या सन्मानार्थ केलेला युद्धघोष आहे. ज्याने अनेक वादळं पायदळी तुडवत हिंदवी स्वराज्य साकारलं आणि शक्तीशाली मुघल साम्राज्याला आव्हान दिलं. ज्या राजाने आपल्याला मोठा वारसा दिला ही त्याची गोष्ट आहे. अभिनेता प्रमुख भूमिका साकारत असलेला हा चित्रपट संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान, नुकताच १४ फेब्रुवारी २०२५ ला छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित ‘छावा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात विकी कौशलने प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक भारावून गेल्याचे पाहायला मिळत आहे. पाच दिवसात या चित्रपटाने १७० कोटींहून अधिक कमाई केली आहे. विकी कौशलने चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर व निर्माते यांच्यासह रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी हजेरी लावली होती.