अभिनेता रिषभ शेट्टीची मुख्य भूमिका असलेला ‘कांतारा’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अॅक्शन आणि थ्रिलने भरलेला हा चित्रपट केवळ भारतीयच नाही तर परदेशी प्रेक्षकांनाही आवडला आहे. चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींबरोबरच ‘कांतारा’ने प्रेक्षकांची मनेही जिंकली आहेत. रजनीकांत, शिल्पा शेट्टी, अल्लू अर्जुनसह अनेक स्टार कलाकारांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. अशात आता चित्रपटाच्या यशावर रिषभ शेट्टीने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेता आणि दिग्दर्शक रिषभ शेट्टीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘कांतारा’बद्दल सांगितलं. हा चित्रपट इतका चांगला व्यवसाय करेल अशी त्याला अपेक्षा नव्हती. म्हणूनच हा चित्रपट इतर भाषांमध्ये डब करण्यात आला नव्हता. रिषभ शेट्टी म्हणाला, “हा चित्रपट माणूस आणि निसर्ग यांच्यातील नातेसंबंधांवर आधारित आहे आणि कर्नाटकातील लोककथांचा एक भाग आहे. त्यामुळे मला तो माझ्या मातृभाषेत लोकांसमोर मांडायचा होता. पण नंतर तो इतर भाषांमध्ये डब करण्याची मागणी सुरू झाली. ट्विटरवर लोक मला ‘हिंदी, तेलगू, तमिळमध्ये प्रदर्शित करा, डू इट पॅन इंडिया’ असे मेसेज करत होते. खरं तर मला असं करण्यात सुरुवातीला अजिबात स्वारस्य वाटत नव्हतं.”

आणखी वाचा- दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनीही केलं ‘कांतारा’चं कौतुक; म्हणाले, “माझ्या अंगावर…”

रिषभ शेट्टी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित करण्यामागचे कारण सांगताना म्हणाला, “आता भाषेचा अडथळा नाही. कुठलीही प्रादेशिक भाषा नाही, हा भारतीय सिनेमा आहे, म्हणूनच ‘कांतारा’ला खूप प्रेम मिळत आहे. परदेशातही लोक हा चित्रपट पाहत आहेत, खूप आनंद वाटतो.” ‘कांतारा’ याआधी निवडक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. पण चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादामुळे त्याला देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आलं. याबद्दल रिषभ म्हणाला, “लोकांनी स्वतः सोशल मीडियावर या चित्रपटाचे प्रमोशन केले आहे. आम्ही जास्त चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित केला नव्हता पण पहिल्याच दिवशी तो हाऊसफुल्ल झाला. लोकांची निवड आणि आवड दोन्ही बदलत आहे. ते आता भारतीय परंपरांबद्दल जागरूक होऊ लागले आहेत.”

आणखी वाचा-‘कांतारा’ची यशस्वी घोडदौड सुरूच; ‘केजीएफ’ला मागे टाकत चित्रपटाने कमावले इतके…

दरम्यान चित्रपटाला मिळालेला तुफान प्रतिसाद आणि यश हे सर्वकाही एका रात्रीत मिळालं नसल्याचं रिषभ शेट्टीचं म्हणणं आहे. त्यासाठी त्याला १८ वर्षे मेहनत करावी लागली आहे. तो म्हणाला, ” मला हे सगळं रातोरात मिळालेलं नाही. त्यासाठी मेहनत आहे. पण अर्थात मी फक्त बॉक्स ऑफिस कलेक्शनसाठी काम केलं असं नाही. पण आता सगळ्याचा समतोल होत आहे. मला मनापासून वाटलं म्हणून मी चित्रपट बनवायचे ठरवलं. मल्याळम, तेलगू आणि इतर देशांतील सर्व भाषांमधील प्रेक्षकांचा मी आभारी आहे.”

Story img Loader