हिंदी चित्रपटसृष्टी आणि कपूर घराण्याचं पहिल्यापासून एक वेगळं नातं आहे. सध्या रणबीर कपूरच्या रुपात कपूर घराण्याची चौथी पिढी कलाविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत आहे. रणबीरने २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सावरिया’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. रणबीर हा दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर यांचा मुलगा आहे. ऋषी कपूर पहिल्यापासूनच उत्तम अभिनयाप्रमाणेच त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जायचे.
“मी एक माणूस आहे आणि चुकीच्या गोष्टी घडल्यावर मला राग येतो” असं ऋषी कपूर यांनी एकदा जाहीरपणे सांगितलं होतं. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने ऋषी कपूर यांना ‘चिंटू’ अशी हाक मारली होती. यावरून ते प्रचंड नाराज झाले होते. त्यांचं लहानपणापासून चिंटू हे टोपणनाव ठेवण्यात आलं होतं. सध्या यासंदर्भातील त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
हेही वाचा : Video : घुमा नाचते हो…! ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’जवळ मुक्ता बर्वेचा मराठमोळा अंदाज, केला जबरदस्त डान्स
ऋषी कपूर यांनी iifa पुरस्कार सोहळ्याच्या रंगमंचावर याबद्दल सांगितलं होतं. अभिनेते तेव्हा ‘सागर’ चित्रपटाचं शूटिंग करत होतं. यावेळी ऋषी कपूर आणि कमल हासन यांचा एकत्र एक सीन होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन रमेश सिप्पी यांनी केलं होतं. ऋषी कपूर iifa पुरस्कार सोहळ्यात म्हणाले होते, “संपूर्ण सीन ओके होता आणि त्यानंतर रमेश सिप्पी यांनी कमल हासनला ‘कमल जी’ अशी हाक मारून शॉट रेडी आहे असं सांगितलं. पण, मला मात्र ‘चिंटू’ असा आवाज दिला.”
हेही वाचा : ‘कन्यादान’ फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात! समोर आला पहिला फोटो, लग्नाला मराठी कलाकारांची मांदियाळी
ऋषी कपूर यांना ही गोष्ट अजिबात आवडली नाही. चिडून त्यांनी रमेश सिप्पी यांना याबद्दल विचारणा केली होती. “कमल माझ्यापेक्षा लहान आहेत त्यामुळे त्यांना ‘कमल जी’ आणि मला ‘चिंटू’ म्हणून हाक मारली असं का केलं?” ऋषी कपूर यांच्या प्रश्नावर रमेश सिप्पी म्हणाले होते, “अरे चिंटूच्या पुढे ‘जी’ लावून आदराने हाक मारावी असं मला मनातून वाटतच नाही.” हे उत्तर ऐकून ऋषी कपूर काहीच बोलले नाहीत पण, त्यांना अतिशय दु:ख झालं होतं.
ऋषी कपूर यांनी त्याच दिवशी आपल्या मुलांची कधीच टोपणनावं नाही ठेवायची असा निर्णय घेतला होता. परंतु, याउलट त्यांच्या घरातील इतर कलाकारांची टोपणनावं बॉलीवूडमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. डबू ( रणधीर कपूर ), चिंपू ( राजीव कपूर), लोलो (करिश्मा कपूर) आणि बेबो (करीना कपूर) अशी सर्वांची टोपणनावं आहेत. दरम्यान, ‘हाऊसफुल २’ चित्रपटामध्ये ऋषी आणि रणधीर कपूर यांची खऱ्या आयुष्यातील टोपणनावं डबू व चिंटू ही ऑनस्क्रीन भूमिकांची नावं म्हणून वापरण्यात आली होती.